'कोरोना हेल्पलाईन'मुळे अडकलेल्या ऊसतोडणी मजुरांची उपासमार टळली; बारामतीची सामाजिक बांंधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 02:15 PM2020-04-17T14:15:22+5:302020-04-17T14:16:07+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून सुरू केलेली कोरोना हेल्पलाईन रस्त्यात अडकलेल्या मजुरांसाठी जीवनदायिनी ठरली आहे.
बारामती : बारामती शहरात कोरोनाला रोखण्यासाठी राबवलेले अनेक उपक्रम पथदर्शी ठरत आहेत. बारामती पॅटर्न जिल्हयात विविध ठिकाणी अवलंब केला जात आहे. शहरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून सुरू केलेली कोरोना हेल्पलाईन रस्त्यात अडकलेल्या मजुरांसाठी जीवनदायिनी ठरली आहे .
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती ' शेअर ' केली .त्यानुसार शुक्रवारी (दि 17) शहरातील डॉ. सुजीत अडसूळ यांना कोरोना हेल्पलाईन ची माहिती ऐकून नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका खेड्यातून विक्रम यांचा फोन आला.त्यांनी पैठण तालुक्यातील जवळजवळ तीस ऊसतोड मजूर कोराळे गावात अडकून पडल्याचे सांगितले.त्यातील काहींचे फोन नंबर मिळवून ती माहिती डॉ. अडसूळ यांना पाठवली.चौकशीअंती ते मजूर बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याची ऊस टोळीतील असल्याची माहिती पुढे आली . सर्वजण कोहार्ले नजीक धोपाडेवस्ती येथे अडकले आहेत आणि त्यांच्या जवळचा शिधा संपलेला अहे . आज सकाळपासून जेवणाची भ्रांत असल्याचे असे डॉ. अडसूळ यांना तत्यांनी सांगितले.
यावर तातडिने डॉ. अडसूळ यांनी त्यांचे सहकारी मित्र बारामती सायकल क्लब चे अँड्. श्रीनिवास वायकर यांच्याशी चर्चा केली .त्यानंतर पणदरे स्थित सामाजिक कार्यकर्ते व कोरोना हेल्पलाईन चे स्वयंसेवक डॉ. महेश जगताप यांच्याशी संपर्क साधन्यात आला .
डॉ.जगताप यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पंचवीस किलो गहू, वीस किलो तांदूळ, डाळ, साखर असे त्यांच्या स्वत:च्या घरातील साहित्य व शिधा घेऊन तातडीने धोपाडेवस्ती येथे निघाले. मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर चालत जाऊन डॉ. जगताप यांनी तो सर्व शिधा त्या टोळीचे मुकादम .राजू शेळके यांच्याकडे सुपूर्त केला.
कोरोना हेल्पलाईन- बारामतीची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे .सकाळी सात वाजता माहीत समजली व अवघ्या दोन तासात गरजूंना शिधा पोहचता झाला. त्या तीस जणांची भूक या कोरोना हेल्पलाइन मुळे भागली .या हेल्पलाईन चे सदस्य हे स्वखर्चाने या सर्व उपक्रम राबवत आहेत .पुढेही ही या संकटाची वेळ संपेपर्यंत काम करणार असल्याचे अँड.वायकर यांनी सांगितले. डॉ. जगताप यांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने शिरगावकर यांनी विशेष कौतुक केले.