आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:34+5:302021-03-28T04:11:34+5:30
-- अवसरी : आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
--
अवसरी : आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अवसरी खुर्द व अवसरी बुद्रुक गावासह अनेक गावातकोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अवसरी खुर्द गावात एकाच दिवशी ९ रुग्ण मिळाले आहेत तर अवसरी बुद्रुक गावात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आता तरी प्रशासनाने व ग्रामपंचायतीने कडक उपाय योजना राबवाव्यात, आठवडे बाजार बंद करावेत, मोठ्या प्रमाणात अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी तहसीलदार व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
ग्रामपंचायतीने गुरुवारी भरणारा आठवडे बाजार, मोठ्या प्रमाणात अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंचर पोलिसांची मदत घ्यावी, त्याच प्रमाणे अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, लोणी या गावांमध्येसुद्धा तात्पुरत्या स्वरुपात आठवडे बाजार बंद करावेत किंवा गर्दीवर निर्बंध आणावेत. जिल्हाधिकारी वारंवार आदेश काढत आहेत, मात्र तालुक्यात याची अंमलबजावणी होत नसल्याचे पाहवयास मिळत आहे.
राज्याचे कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील ८ ते १५ दिवसांनी तालुक्याच्या प्रशासनाची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देत असतात मात्र तहसीलदार व पोलीस अधिकारी कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. तोंडाला मास्क न लावता लोक सर्रास फिरताना दिसत आहेत. अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न सोहळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहवयास मिळते, तर तीन चाकी अॅपे गाडीत १० ते १२ प्रवासी वाहून नेत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
--
चौकट
आतापर्यंत सध्या ५ हजार ७५४ रुग्ण
तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, पारगाव, निरगुडसर, मेंगडेवाडी, गावडेवाडी आदी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या तालुक्यात ५७५४ रुग्णांपैकी ५१५२ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून १२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४७८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. अवसरी खुर्द गावात गुरुवारी कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात आला होता त्यात ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहे. तसेच या अगोदर दररोज गावात ३ ते ४ रुग्ण सापडले आहे.
--