उरुळी कांचन येथील ४७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, गुरुवारी तापामुळे रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 01:12 PM2020-04-18T13:12:42+5:302020-04-18T13:19:31+5:30
उरुळी कांचन शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने भीतीचे वातावरण..
पुणे : (कदमवाकवस्ती) : लोणी स्टेशन येथील एका मोठ्या रुग्णालयात ४७ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ही महिलाउरुळी कांचन येथील (ता. हवेली) रहिवासी असून, अंगात ताप असल्यामुळे गुरुवारी (ता. १६) दुपारी रुग्णालयात दाखल झाली होती.
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना तपासणी केल्यानंतर महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल आला.तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, पूर्व हवेलीत हा पहिलाच कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला असून यामुळे उरुळी कांचन व लोणी काळभोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या महिलेची व तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले.
पूर्व हवेली तालुक्यातील वाघोलीनंतर उरुळी कांचन शहरात शुक्रवारी रात्री १० नंतर कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, कदमवाकवस्ती(ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या कडून खबरदारी चा उपाय म्हणून लोणी स्टेशन येथील ज्या रुग्णालयात कोरोना बाधित महिला होती.त्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत चे ग्रामसेवक,लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.दगडू जाधव व कदमवाकवस्ती कोरोना प्रतिबंधक समिती यांनी लोणी स्टेशन येथील रुग्णालयाला भेट देऊन कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व स्टाफची माहिती मागितली असून त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.