राजगुरूनगर एसटी आगारात कोरोनाचा शिरकाव ; प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:22 PM2020-09-02T19:22:55+5:302020-09-02T19:23:05+5:30
कोरोनाबाधित सापडल्यामुळे राजगुरूनगर एसटी आगाराच्या एसटीच्या चक्राची गती काहीशी मंदावली आहे.
राजगुरुनगर ; राजगुरूनगर एसटी आगारात कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून काही कर्मचारी स्वतःहून विलगीकरणात राहिले आहेत.
राजगुरूनगर एसटी आगारातील कार्यशाळेतील कार्यालयात व आगारव्यवस्थापक यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले एक कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले असून, त्यामुळे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या राजगुरुनगर एसटी आगाराच्या एसटीच्या चक्राची गती काहीशी मंदावली आहे. तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. मधुमेहाच्या व्याधीने त्रस्त असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी याचा धसका घेऊन कामावर येणेच थांबविले आहे. तसेच ही बातमी बाहेर पसरल्यामुळे एसटीची आधीच कमी असलेली प्रवासी संख्या अधिकच रोडावली आहे.
राजगुरुनगर एसटी बसस्थानकावरही सोशल डिस्टंसिंगचे कोणतेही पालन होताना दिसत नाही. बसस्थानक परिसरात हॉटेल हॉटेलचे अनेक स्टॉल चालू केल्यामुळे प्रवाशांच्या गर्दीत या स्टॉलमुळे भर पडत आहे. व तेथे कोणतेही सोशल डिस्टंसिंग पाळताना दिसत नाही. हॉटेलचे बेसिन-नळकोंडाळे बसस्थानकात बांधल्याने अनेक प्रवासी तेथेच थुंकणे, तंबाखू-पान खाऊन पिचकाऱ्या मारणे, ओकाऱ्या काढणे असे प्रकार करत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्यास आयतेच साधन प्राप्त झाल्याचे काही प्रवाशांनी बोलताना सांगितले. तसेच याच नळावर हॉटेलचे कामगार भांडी विसळत असतात. त्यामुळे प्रवाशांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाला अवकळा आल्याचे दिसून येते.
बसस्थानकावर झोपलेले तळीराम, हॉटेलचा कचरा भरून वाहत असलेले बसस्थानकाच्या फलाटावरचे कचऱ्याचे डबे असे दृश्य येथे नित्य दिसत आहे. आगारात कोरोनाग्रस्त कर्मचारी सापडल्याने कोरोनाच्या भीतीने एसटीचे कर्मचारी भेदरलेल्या अवस्थेत काम करताना दिसतात. संबंधित कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याचे कुटुंबियही विलगीकरणात राहिले आहे.