कंत्राटी कर्मचारी कमी झाल्यामुळे भिगवण येथे कोरोना तपासणी झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:50+5:302021-09-04T04:14:50+5:30
महाराष्ट्र राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वेळी सर्व संस्था स्तरावरून कोरोनाची हाताळणी करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ ...
महाराष्ट्र राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वेळी सर्व संस्था स्तरावरून कोरोनाची हाताळणी करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ मंजूर करण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाची घटती आकडेवारी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या लसीकरण यामुळे केंद्र सरकारने यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यानुसार या कंत्राटी सेवा कमी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माध्यमातून आदेश काढीत अशा सेवा थांबविण्यात आलेल्या आहेत. मात्र, भिगवण येथे यामुळे कोरोना तपासणी बंद करण्यात आली आहे. तर आजारी रुग्णांना खासगी दवाखान्यात कोरोनाचा रिपोर्ट असल्याशिवाय उपचार केले जात नसल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. एका बाजूला शासन तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करीत असताना कोरोना तपासणी आणि उपचार बंद केल्यामुळे नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले काय? अशी भावना रुग्ण व्यक्त करीत आहेत. तर तातडीने कोरोना तपासणी आणि उपचार सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजपाचे संजय देहाडे यांनी दिला आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी जीवन सरतापे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोरोना तपासणी टेक्निशियन उपलब्ध नसल्यामुळे बंद असल्याचे सांगितले. तर नियुक्तीवर असणाऱ्या टेक्निशियन नातेवाइकांच्या मृत्यूमुळे रजेवर असून तालुक्यातील इतर ठिकाणाचा टेक्निशियन उपलब्ध करून तपासणी सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले.
खासगी दवाखाने रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पाहिल्याशिवाय उपचार करीत नसल्यामुळे व्हायरल आजाराने त्रास असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. कर्मचारी कमी केले असले तरी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणती योजना आहे, याची माहिती तहसीलदार यांनाही देता येत नसल्याचे पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी सांगितले.