नसरापूर येथे दुकानदार, व्यापारी व नागरिकांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:16+5:302021-04-21T04:12:16+5:30
-- नसरापूर : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी नसरापूर (ता. भोर) येथे विविध प्रकारच्या दुकानदार व व्यापारी वर्गाची वैद्यकीय पथकांकडून ...
--
नसरापूर : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी नसरापूर (ता. भोर) येथे विविध प्रकारच्या दुकानदार व व्यापारी वर्गाची वैद्यकीय पथकांकडून कोरोना तपासणी करण्यात आली. भोर तालुक्यात नसरापूर हे मोठी व्यापारी बाजारपेठ असून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत नसरापूर, महसूल विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने प्रत्येक व्यापाऱ्याची वैद्यकीय पथकांकडून कोरोना अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये २९६ चाचणी झाल्या त्यापैकी १० जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.
भोर तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन चौकशी करण्यासह आजारी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व स्टाफ संक्रमण थोपविण्यासाठी परिश्रम घेत आहे. शहरासह तालुक्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरातील भाजी विक्रेते, व्यावसायिक,नागरिक यांची ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना तपासणी घेण्यात आली.
एकूण २९६ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याकरिता नसरापूर मधील प्रत्येक घरोघरी जाऊन व संपूर्ण बाजारपेठेत कुटुंब सर्वेक्षणचे नियोजन विस्तार अधिकारी राम राठोड, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, ग्रामसेवक अभय निकम व विजयकुमार कुलकर्णी, नसरापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षिका आणि नसरापूर व्यापारी असोसिएशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला .
या पथकामध्ये डॉ.जयदीप कापसीकर, डॉ. मिलिंद अहिरे, आरोग्य सेविका स्मिता दराडे, दीक्षा मोरे,गोबे प्रकाश, नसरापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी रुपेश ओव्हाळ,अक्षय सकपाळ,अमित राऊत यांनी परिश्रम घेतले.
--
फोटो क्रमांक : २०नसरापूर व्यापारी कोरोना टेस्ट
फोटो आणि ओळ : नसरापूर येथे व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करताना वैद्यकीय कर्मचारी