काेराेनाचा प्रसार हवेतून, मृतदेहांमुळे नाही; अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: January 13, 2024 05:17 PM2024-01-13T17:17:14+5:302024-01-13T17:19:33+5:30
काेराेनाचा प्रसार हवेतून हाेतो. बाॅडीमुळे कोरोना पसरत नाही, यावर काेविड टास्क फाेर्सचे एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे....
पुणे : आता काेराेनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडे सोपविण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय काेविड टास्क फाेर्सने झालेल्या बैठकीत घेतला आहे. काेराेनाचा प्रसार हवेतून हाेतो. बाॅडीमुळे कोरोना पसरत नाही, यावर काेविड टास्क फाेर्सचे एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात काेराेनाचा पहिला रुग्ण ९ मार्च २०२० मध्ये आढळला हाेता. तेव्हापासून गेल्या सुमारे चार वर्षांत काेराेनामुळे आतापर्यंत ८१ लाख रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्या सर्वांचा अंत्यविधी संबंधित यंत्रणेने म्हणजे ज्या दवाखान्यात मृत्यू झाला त्या भागातील नगरपालिका, महापालिकेकडे अंत्यविधीची जबाबदारी हाेती. मात्र, आता ते करण्याची गरज नाही.
कोविड रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महानगरपालिकेला, नगरपरिषदेकडे अंत्यविधीसाठी देण्याची आवश्यकता नसून इतर आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींप्रमाणेच त्यांचे मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात यावेत, असे नुकत्याच डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काेविड टास्क फाेर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काेराेना हा श्वसनमार्गाचा (रेस्पिरेटरी एअरबाॅर्न इन्फेक्शन) व हवेतून पसरणारा आजार आहे. पूर्वी त्याबाबत आपल्याला कळाले नव्हते. खबरदारी म्हणून नातेवाइकांकडे मृतदेह न देण्याच्या मार्गदर्शक सूचना हाेत्या. ओमिक्राॅन हा हवेतून पसरताे. काेराेनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहापासून ताे पसरत नाही, असे निदर्शनास आले असल्याने आता मृतदेह नातेवाइकांकडे देण्याचा निर्णय काेविड टास्क फाेर्सने घेतला आहे.
- डाॅ. रमण गंगाखेडकर, अध्यक्ष, राज्य काेविड टास्क फाेर्स