कोरोना लाटेला ओहोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:22+5:302021-05-18T04:12:22+5:30
अर्थात सोमवारी गेल्या दोन महिन्यांतली सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आढळली असली तरी ‘आरटी-पीसीआर’ आणि अँटिजन चाचण्यादेखील गेल्या दोन महिन्यांत ...
अर्थात सोमवारी गेल्या दोन महिन्यांतली सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आढळली असली तरी ‘आरटी-पीसीआर’ आणि अँटिजन चाचण्यादेखील गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच दहा हजारांपेक्षा कमी झाल्या. एकूण ७ हजार ८६२ जणांच्या चाचण्या घेतल्यानंतर सोमवारी ६८४ नवे कोरोनाबाधित आढळून आले.
कोरोनाची लाट ओसरली असे म्हणताना मार्च महिन्यात दुसरी लाट आली. १९ मार्चला सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ८८८ झाली. हा आकडा नंतर वाढतच गेला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक १८ एप्रिल रोजी झाला. या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या ५६ हजार ६३६ झाली. कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०१९ रोजी आढळून आला होता. तेव्हापासूनची ही सर्वोच्च सक्रिय रुग्णसंख्या ठरली.
थेट पन्नास हजारांपुढे गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या नंतर हळूहळू घसरू लागली. एप्रिलच्या २४ तारखेला सक्रिय रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या खाली आली आणि ती ४९ हजार ४७२ झाली. मे ४ या दिवशी ती चाळीस हजारांच्या खाली येत ३९ हजार ८३९ इतकी झाली. पुढे ११ मे रोजी सक्रिय रुग्णांची संख्या आणखी दहा हजारांनी घसरली आणि २९ हजार ७०२ झाली. सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा दहा हजारांपेक्षा जास्तने कमी होत सोमवारी, १७ मे रोजी ती दहा हजारांच्या आत आल्याने दिलासा मिळाला आहे.
चौकट
सर्वाधिक चाचण्या
एप्रिल महिन्यात कोरोना लाटेचा सर्वाधिक प्रकोप होता. या महिन्यात एकाच दिवशी तब्बल चार ते सात हजारांपर्यंत नवे कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधितांच्या या वाढत्या संख्येमुळे आरटी-पीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले. सर्वाधिक कोरोना चाचण्या ८ मे रोजी १७ हजार ११८ एवढ्या झाल्या. त्यादिवशी २ हजार ८३७ कोरोनाबाधित आढळून आले.
चौकट
‘टेस्ट कमी, रुग्ण कमी’
एप्रिल महिन्याच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात कमी झाले आहे. त्याचसोबतीने नव्या कोरोनाबाधितांची संख्याही घटताना दिसत आहे. यामुळे ‘टेस्ट कमी, रुग्ण कमी’ असे यातून ध्वनित होते. आकडेवारी असे सांगत असली तरी गेल्या महिन्याप्रमाणे चाचणी करुन घेण्याची गरज पुणेकरांना आता जाणवत नाही ही देखील सकारात्मक वस्तुस्थिती आहे. सगळे लगेच आलबेल झाल्याची स्थिती मात्र अद्यापही नाही. कारण नव्या कोरोनारुग्णांची संख्या कमी असली तरी ‘पॉझिटिव्हिटी रेट’ म्हणजेच दर शंभर चाचण्यांमागे आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची टक्केवारी अजूनही दहाच्या खाली आलेली नाही. ‘पॉझिटिव्हिटी रेट’ दहा टक्यांच्या आत आल्याखेरीज कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे म्हणता येणार नाही. मात्र त्याची चाहूल या लाटेला लागलेल्या ओहोटीने दिली आहे.