कोरोनामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागले बदलीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:56+5:302021-06-29T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वार्षिक नियतकालिक बदल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वार्षिक नियतकालिक बदल्या ३० जूनपर्यंत करू नयेत, असे आदेश काढले होते. आता शासन आणखी मुदतवाढ देणार की बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनामध्ये शासनाकडून आणखी काही दिवस मुदतवाढ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्यामध्ये केल्या जातात. परंतु, यंदा कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढल्याने निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३० जूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया थांबली आहे. तसेच सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्यास मात्र परवानगी दिली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची बदली करणे आवश्यक असेल तर सक्षम प्राधिकारी खात्री करून त्याची बदली करू शकतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आता ही ३० जूनची मुदतवाढ देखील संपत आल्याने कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहेत.