कोरोना कमी... व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:52+5:302021-08-21T04:13:52+5:30
पुणे : कोरोनाच्या तिस-या लाटेचे संकट घोंघावत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. सर्वच रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये येणा-या ...
पुणे : कोरोनाच्या तिस-या लाटेचे संकट घोंघावत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. सर्वच रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये येणा-या मुलांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. एनफ्लूएन्झा ए, आरएसव्ही या विषाणूंचा मुलांमध्ये सध्या जास्त प्रादूर्भाव दिसून येत आहे. कोरोनापेक्षा या विषाणूंची लागण होण्याचे प्रमाण सध्या जास्त आहे. शहरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने पालकांना मुलांबद्दल जास्त चिंता वाटत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या दररोज ५०-६० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
पावसाळा अनेक विषाणूजन्य आजारांना आमंत्रण देतो. दूषित अन्न आणि पाणी, खराब वातावरण, उघड्यावरील पदार्थ अशा अनेक कारणांमुळे मुलांची सध्या तब्येत बिघडत आहे. खोकला, ताप, डोकेदुखी, उलट्या, ओटीपोटात दुखणे, अंगदुखी या लक्षणांनी लहान मुले बेजार झाली आहेत. अनेक मुलांना ताप सहा-सात दिवसांपर्यंत उतरताना दिसत नाही. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडत आहे.
---------------------
पाच वर्षांखालील मुलांमध्ये छातीत घरघर होणे, कफ होणे, ताप सहा-सात दिवस न उतरणे अशी लक्षणे जाणवत आहेत. जास्त ताप, उलटी, डोकेदुखी, सांध्यांमध्ये वेदना अशी लक्षणे असल्यास डेंग्यूचे निदान होऊ शकते. डेंग्यू असल्याचे समजले तर कोरोनाबाबतची निम्मी चिंता मिटते. कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या संपर्कात आल्यासच लहान मुलांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले जाते. प्लेटलेट काऊंटवर अवलंबून न राहता वॉर्निंग साईन्स असातील तर लगेच डेंग्यूची चाचणी करण्यास सांगितले जाते. सध्याच्या काळात एन्फ्लूएन्झा ए, रेस्पिरेटरी सेंशियल व्हायरस यांच्या प्रादूर्भावाचे प्रमाण जास्त आहे. घरात कोणी आजारी असल्यास त्यांच्यापासून लहान मुलांना दूर ठेवावे. संसर्ग टाळण्यासाठी मास्क आवर्जून वापरावा.
- डॉ. संजय मानकर, बालरोगतज्ज्ञ
------------------
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षीच बाह्यरुग्ण विभागामध्ये बालरुग्णांचे प्रमाण वाढते. दररोज ५०-६० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असा त्रास दिसून येत आहे. मात्र, कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे.
- डॉ. खान, बालरोगजतज्ज्ञ, औंध जिल्हा रुग्णालय
---------------------
काय काळजी घ्यावी?
- मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ देऊ नये.
- घरात कोणाला व्हायरल इन्फेक्शन असल्यास मास्क आवर्जून वापरावा.
- उघड्यावरचे पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
- पाणी उकळून, गाळून प्यावे. ताजे अन्नपदार्थ खावेत.
- डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत.