कोरोना, मोबाईलवेडामुळे निर्माण होतोय निद्रानाशाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:42+5:302021-06-28T04:08:42+5:30
पुणे : कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, आरोग्याचे संकट आणि मोबाईलचे वेड यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास जाणवू लागला आहे. ...
पुणे : कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, आरोग्याचे संकट आणि मोबाईलचे वेड यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास जाणवू लागला आहे. कमी झोपेचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास होत असल्यास वेळीच योग्य पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनिश्चितता कमालीची वाढली आहे. काहींसमोर आर्थिक संकट आ वासून उभे आहे, तर काहींनी कोरोनामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. त्यामुळे आयुष्यात मानसिक ताण, नैराश्य निर्माण झाले आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, कॉलेज यामुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींचा स्क्रीन टाईम वाढला आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम झोपेवर होत आहे. त्यामुळेच निद्रानाशाचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळत आहेत.
-----
झोप का उडते?
काही रुग्णांमध्ये कोरोना झाल्यावर किंवा होऊन गेल्यावर जडणारा त्रास म्हणजे निद्रानाश. कोरोनानंतर अनेकांच्या झोपेचा पॅटर्न बदललेला पाहायला मिळत आहे. काहींना सुरुवातीचे दोन-तीन तास झोप लागते, मध्यरात्री जाग येते आणि पहाटे थोडा वेळ झोप लागते. काहींना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. तर काहींची झोप पहाटेच मोडते. कोरोनातील ताण, नैराश्य, टेन्शन यामुळेही झोपेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. मेलॅटोनिन हार्मोनचे प्रमाण असंतुलित झाल्यामुळेही झोपेवर परिणाम होतो. झोप पूर्ण न झाल्यास एकाग्रता कमी होणे, अस्वस्थता वाढणे, असे दुष्परिणाम जाणवतात.
- डॉ. सुहृद सरदेसाई, जनरल फिजिशियन
---
झोप किती हवी?
नवजात बाळ - १६ ते १८ तास
एक ते पाच वर्षे - १० ते १२ तास
शाळेत जाणारी मुले - १० तास
२१ ते ४० - ७ ते ८ तास
४१ ते ६० - ७ ते ८ तास
६१ पेक्षा जास्त - गरजेनुसार
-----
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
डॉ. सरदेसाई म्हणाले, ''निद्रानाशाचा त्रास असलेल्या रुग्णांना व्यायाम, तसेच काही थेरपी सुचवल्या जातात. अगदीच आवश्यकता भासल्यास औषधे दिली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेणे घातक ठरू शकते. एखादी गोळी सातत्याने घेतल्यास त्याची मेंदूला सवय होते. हळूहळू एका डोसचा परिणाम होईनासा होतो. मग लोक आपणहून डोस वाढवतात. दिवसा झोप येणे, शरीर थरथरणे, हृदयाची गती वाढणे असे दुष्परिणाम जाणवतात.''
----
चांगली झोप यावी म्हणून...
*झोपण्याच्या वेळेच्या कमीत कमी तासभर आधी तरी सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बंद करावेत. असे केल्याने उत्तेजित मेंदू शांत होऊन स्लीप मोडमध्ये जाण्याची पूर्वतयारी करतो.
* झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ पूर्वनिश्चित असावी. लहान मुलांसाठी झोपण्याची वेळ दहापेक्षा उशिरा नसावी.
• वामकुक्षीची सवय असेल तर ती अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी.
• झोपण्याच्या चार तास आधी मद्यपान, धूम्रपान, चहा, कॉफी सेवन टाळावे.
• व्यायाम नियमितपणे करावा; पण झोपण्यापूर्वी दोन तास व्यायाम टाळावा.
•झोपण्यासाठी आरामदायी बिछाना निवडावा. बेडरूमचे तापमान आरामदायक असावे.
•बेडरूममधील व बाहेरील विचलित करणारे आवाज व प्रकाश शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न करावा.
•आपले जैविक घड्याळ पर्यावरणातील सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. त्याचा समतोल सांभाळा.
•झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे प्रार्थना करा, आवडीचे संगीत ऐका, सकारात्मक विचार करा.