कोरोना संपलेला नाही, मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:16+5:302021-09-25T04:11:16+5:30

पुणे : कोरोनाचे संकट अजूनही कायम असून, कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, ...

Corona is not finished, take strict action against those who do not use masks | कोरोना संपलेला नाही, मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा

कोरोना संपलेला नाही, मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा

Next

पुणे : कोरोनाचे संकट अजूनही कायम असून, कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पुणे विभागीय कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार दिलीप मोहिते, ॲड. अशोक पवार, सुनील शेळके, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा १ कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. जिल्ह्यात ८३ टक्के लोकांनी पहिला डोस व ४४ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुणे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये १,४४० पिशव्या रक्त संकलन होणे ही समाधानाची बाब आहे. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.

प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगले काम केले असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कोविड टास्क फोर्सचे सदस्य व आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक पूर्वतयारीविषयी आणि कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात १,९१४ कोविड केंद्रांत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ८९८ शासकीय तर १०१६ खासगी केंद्र आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर ०.१८ टक्के नागरिक बाधित आढळून आले आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर ०.२२ टक्के नागरिक बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील दैनंदिन बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९८ टक्के तर मृत्यूदर १.६ टक्के आहे. शिरूर, आंबेगाव, मावळ, जुन्नर आणि दौंड तालुक्यातील आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या बैठकीत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, यशदा उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सुरुवातीला स्व. शरद रणपिसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Corona is not finished, take strict action against those who do not use masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.