पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे गांभीर्य नाही, विनामास्क फिरणा-या ३१७ नागरिकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 04:13 PM2021-04-10T16:13:52+5:302021-04-10T16:14:57+5:30
प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करू नये, पोलिसांनी केले आवाहन
पिंपरी: पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहे. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करतानाचे चित्र दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत विनामास्क फिरणाऱ्या ३१७ नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहरात दिवसाची जमावबंदी आणि सायंकाळी सहा नंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. आदेशात बदल करून फक्त अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामध्येही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस विचारपूसही करत होते. रस्त्यांवर नेहमीप्रमाणे गर्दी नसूनही आता कामासाठी फिरणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ लागले आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याने ते नियमांना धुडकावून बिनधास्तपणे वागत आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले आहे. अनेकांना या कारणावरून स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. सद्यस्थिती चिंताजनक झाली असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे. असे आवाहनही पोलीस करत आहेत. तरीही नागरिकांनी न ऐकल्याने पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडपोलिसांनी आज एमआयडीसी भोसरी (३२), भोसरी (२५), पिंपरी (१४), चिंचवड (८२), आळंदी (४४), दिघी (१७), वाकड (०६), हिंजवडी (२४), देहूरोड (२६), तळेगाव एमआयडीसी (०६), चिखली (२७), रावेत चौकी (०२), शिरगाव चौकी (१२), या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.