शिरूरच्या पूर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव, अनेकांचे संसार उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:06+5:302021-05-10T04:10:06+5:30
शिरसगाव काटा येथे बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू दहा दिवसांपूर्वी शिरसगाव काटा येथे प्रदीप श्रीरंग जाधव यास कोरोनाची लागण झाल्याने शिरूर ...
शिरसगाव काटा येथे बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
दहा दिवसांपूर्वी शिरसगाव काटा येथे प्रदीप श्रीरंग जाधव यास कोरोनाची लागण झाल्याने शिरूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले होते. यानंतर त्याचे वडील श्रीरंग जाधव यांनाही मुलाच्या मृत्यूचा जबर धक्का बसल्याने पाच दिवसांपूर्वी दुर्दैवी राहत्या घरी निधन झाले होते.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात वाढलेले रुग्ण तसेच अचानक तरुण व घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कोरोना आजाराचा मोठा संसर्ग झाला आहे. एप्रिल महिना ते आजपर्यंत या भागात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पोपट ज्ञानदेव जगताप याचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता. या झालेल्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी आई वच्छलाबाई ज्ञानदेव जगताप यांचाही दुर्दैवी मुत्यू झाला असल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. परिसरात मध्यंतरी ढगाळ वातावरण झाल्याने त्या वेळी पोपट जगताप हे कांदा सुरक्षित राहावा यासाठी वखार तयार करण्यासाठी धावपळ करत असताना त्यांना या आजाराची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट जगताप यांच्यावर घरातील सर्व कौटुंबिक जबाबदारी होती, पण घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पोपट जगताप यांना कोरोना झाल्यानंतर त्याची लागण त्याची आईला झाली होती. मुलाचा अंत्यविधी कोठे होत नाही तोच मृत्यूने आईलाही हिरावून नेले. शेवटी पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे आईला सहन न झाल्याने आईने दुसऱ्या दिवशी आपला प्राण सोडला.