Corona Alert: पुण्यातील रुग्णवाढ चिंताजनक; तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 02:05 PM2022-01-23T14:05:04+5:302022-01-23T14:05:46+5:30
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्येत ३३ हजार ४९६ ने वाढ झाली आहे.
निनाद देशमुख
पुणे : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा वेगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत बाधित होण्याचा दर हा सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दुसऱ्या लाटेत बाधित दर हा २३.९ टक्के होता. मात्र, या वर्षी तिसऱ्या लाटेत हा दर २९.५ टक्के आहे. रुग्णवाढीचा दर अधिक असला तरी कोरोना मुक्त रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. या सोबत मृत्यृदर हा १.४ टक्के एवढा आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्येत ३३ हजार ४९६ ने वाढ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोेनाचा रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळला. या नंतर शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. पहिल्या लाटेबरोबरच दुसऱ्या लाटेतही रुग्ण वाढले, एप्रिल महिन्यात दुसरी लाट आली. या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या ही सर्वाधिक होती. मे महिन्यानंतर रुग्ण संख्या हळूहळू कमी झाली. मात्र, जानेवारी २०२२ मध्ये तिसऱ्या लाट आली. या लाटेत दोन्ही लाटेंपेक्षा रुग्णवाढीचा दर हा सर्वाधिक आहे. ही बाब गंभीर असली तरी या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण पहिल्या दोन्ही लाटेंपेक्षा कमी आहे. दुसऱ्या लाटेत जानेवारी महिन्यात आजच्या घडीला २३.९ टक्के रुग्णवाढीचा दर होता. या लाटेत हा दर २९. ५ टक्के एवढा आहे. तिसऱ्या लाटेत क्रियाशील रुग्ण जास्त असले तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. जे रुग्ण आढळत आहेत त्यांना सौम्य लक्षणे आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने विषाणूचा शरीरातील प्रभाव कमी झाला आहे. असे असले तरी सध्याची रुग्णवाढ ही चिंताजनकच म्हणावी लागेल. या लाटेचा वेग कमी करायचा असेल तर कोरोना नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यालील एकुण कोरोना मुक्तीचा दर हा ९२. २ तर मृत्यूदर हा १.४ टक्के
गेल्या आठवड्यात पुणे महानगर पालिकेच्या षेत्रात एकुण ३८ हजार ५८१ रुग्ण बाधित झाले होते. त्या पेकी २१ हजार ७४२ रुग्ण हे बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा आठवड्याचा दर हा ५६ टक्के ऐवढा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत १९ हजार ०३९ रुग्ण आढळले. त्या पेकी ९ हजार ४६५ रुग्ण हे बरे झाले. रुग्ण मुक्तीचा दर हा ५० टक्के होता. ग्रामीण भागात १२ हजार ७२७ रुग्ण आढळले. त्या पेकी ५ हजार ८४१ रग्ण हे बरे झाले. रुग्णमुक्तीचा दर हा ४६ होता. एकुण जिल्ह्यात ७० हजार ६१७ रुग्ण आढळले. त्या पेकी ३७ हहजार०४८ रुग्ण बरे झाले. रुग्ण मुक्तीचा दर हा ५२ टक्के ऐवढा होता. जिल्ह्यालील एकुण कोरोना मुक्तीचा दर हा ९२. २ तर मृत्यूदर हा १.४ टक्के एवढा आहे.