इंदापूरात कोरोना रुग्णसंख्येने घेतली उसळी! दुपट्ट वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:00 PM2021-05-16T14:00:56+5:302021-05-16T14:01:03+5:30
शनिवारी २२६ जण कोरोनाबाधित
कळस: इंदापूर तालुक्यात लॉकडाऊन मुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या कमी होऊन दिलासा मिळत असताना कोरोना रुग्ण संख्येने तालुक्यात उसळी घेतली आहे. शंभर पेक्षा कमी रुग्णसंख्या असताना शनिवारी थेट दुपट्ट वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात ७०८ जणांच्या तपासणीत २२६ जण कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ११ मे पासून संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे रुग्णसंख्या निम्म्याने कमी होऊन शंभर पर्यंत आली होती. ८ मेला २३५ असणारी रुग्णसंख्या शनिवार पर्यंत १०० च्या आत होती. मात्र शनिवारी अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच जास्त बाधीत आढळून आले आहेत. आरोग्य, महसूल व सर्वच प्रशासन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मेहनत घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपालिका प्रशासन लसीकरण व आरोग्य तपासणीबाबत नागरिकांना जागृत करत आहे. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे कष्ट घेत कोरोना बधितांवर उपचार करत आहेत. मात्र वाढ झाल्याने प्रशासनालाही अडचणी येऊ लागल्या आहेत. तालुक्यात खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांसाठी नातेवाईकांची धावपळ सुरु आहे.
इंदापूर तालुक्यात आज अखेर ग्रामीण भागात १२ हजार २३४ तर शहरी भागात २ हजार १३५ रुग्ण असून एकूण १४ हजार ५९५ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी ३२० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर १२ हजार ३४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.