पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा घोळ मिटेना; यंत्रणांत विसंवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:22 AM2020-08-03T05:22:10+5:302020-08-03T05:22:38+5:30
राज्य आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग व महापालिका आरोग्य विभागाकडील माहितीत तफावत आढळून येत आहे.
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांचा घोळ सुरू असून केंद्रीय पथक व मुख्यमंत्र्यांना दिलेले आकडे वेगवेगळे आढळले आहेत. त्यांच्यासमोर केलेल्या सादरीकरणात व पुणे महापालिकेअंतर्गत बाधित, घरी सोडलेले व अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तफावत आढळून आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येबाबत नेमके कोणते आकडे खरे मानायचे, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग व महापालिका आरोग्य विभागाकडील माहितीत तफावत आढळून येत आहे. व्हेंटिलेटरवरील व आयसीयूमधील गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने त्यात बदल करीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डशी मेळ घातला. केंद्रीय पथकाने २८ जुलैला पुण्यात भेट दिली होती. तेव्हा पुणे महापालिकेत २६ जुलैला बाधितांचा आकडा ५१ हजार ५५७ असल्याचे म्हटले आहे. त्याच दिवशीच्या महापालिकेच्या अहवालात मात्र तो ४८ हजार ५७ एवढा आहे. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्येही साडेतीन हजारांची तफावत आहे.