'तो' कोरोनाबाधित ओमायक्रॉन निगेटिव्ह; पुणेकरांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 12:11 AM2021-12-05T00:11:45+5:302021-12-05T00:13:12+5:30
२० दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील झांबियामधून आलेल्या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. तसंच त्याला हलका तापही आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिण आफ्रिकेजवळील झांबिया देशातून पुण्यात २० दिवसांपूर्वी पुण्यात आलेला व कोरोनाबाधित आढळून आलेल्या त्या ६० वर्षीय व्यक्तीचा तपासणी अहवाल आज ( दि. ४) प्राप्त झाला आहे. त्या तपासणीत सदर रुग्ण ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
सदर व्यक्तीचा अहवाल अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असून, त्याला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. २० दिवसापूर्वी झांबिया मधून आलेल्या या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता व त्याला हलका तापही आला होता. त्यामुळे त्याची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तेव्हा तो कोरोनाबाधित आढळून आला. खबरदारी चा उपाय म्हणून त्याची ३० नोव्हेंबरला ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचं ठरले व त्यासाठी त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यात तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.