कोरोना रुग्ण वाढले, रेमडेसिविरही मुबलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:46+5:302021-03-13T04:16:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनाचे रूग्ण फेब्रुवारी, २०२१ च्या मध्यापासून झपाट्याने वाढत असून, दररोज सुमारे दहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोनाचे रूग्ण फेब्रुवारी, २०२१ च्या मध्यापासून झपाट्याने वाढत असून, दररोज सुमारे दहा हजार नवीन रुग्णांची भर पडत आहेत़ या अनुषंगाने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीदेखील वाढली असून, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यासाठीचा मुबलक साठा आपल्या रूग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे़
आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ़ संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये ज्या कोरोनाबाधित रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे, त्यांना शासकीय दरानुसार ते उपलब्ध करून देण्यात येईल़ सध्या या इंजेक्शनची पुण्यात मोठी मागणी नसली तरी, महापालिकेकडे त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे़
फेब्रुवारी, २०२१ पासून रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांसाठी या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली. परंतु छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नसल्याने औषधेविक्री ही छापील विक्री किमतीनुसार होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले आहे़
रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १ हजार ३०० रुपयांनी म्हणजे सरासरी १ हजार ४० रुपये किमतीत पुरवठा केल्याचे आढळून आले. पण याबाबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किमतीबाबत पडताळणी केली असता, काही रुग्णालये व विक्रेते खरेदी किंमत कमी असून देखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी याबाबत दखल घेऊन सदर रेमडेसिविर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्यक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. तसेच शासनाने रुग्णालयांना सदर रेमडेसिविर इंजेक्शनच्या खरेदी किमतीवर जास्तीत जास्त ३० टक्के जास्त किंमत म्हणजेच दीड हजार रूपये दर आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरणाला प्रस्ताव दिला आहे़