कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:16 PM2021-03-25T15:16:23+5:302021-03-25T15:16:57+5:30

कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर आधीच टेन्शनमध्ये आलेल्या कुटुंबियांना आता महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकाकडून पण योग्य ती मदत मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Corona patients 'no bed information'; Pune Municipal Corporation's 'Helpline' number just for the name | कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी

कोरोना रुग्णांना मिळेना बेड्सची माहिती' ; पुणे महापालिकेचा 'हेल्पलाईन' क्रमांक फक्त नावासाठी

Next

पुणे : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना पालिकेकडून सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात आहे. तसेच रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याचा देखील दावा महापालिकेकडून येत आहे.मात्र प्रत्यक्षात रुग्णांना वैद्यकीय यंत्रणेसंदर्भात माहिती मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा  लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावरून पण प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. 

पुण्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जम्बो रुग्णालय देखील सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना बाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध करून दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे.मात्र,प्रत्यक्षात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरून कोणत्याही प्रकारची प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुणेकरांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात मदत मिळण्यात येत असलेल्या अडचणीत आणखीनच भर पडत आहे. 

वानवडीतील एक ४४ वर्षीय महिला बुधवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर उपचारासाठी बेड मिळण्यासाठी सातत्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करण्यात आला उशिरापर्यंत कुठलाही कॉल उचलण्यात आला नाही अशी माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. तसेच येरवडा येथील ७२ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.त्यानंतर या महिलेच्या कुटुंबियांकडून उपचारासाठी बेड मिळावा म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क केला मात्र, त्यांना शेवटी शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात बेड उपलब्ध झाला.  अशाप्रकारे अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार मिळण्यात अडचण येत असल्याने अपडेट वैद्यकीय यंत्रणा मिळणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पुणे शहरातील नागरिकांना कोरोना विषयी वैद्यकीय यंत्रणेची माहिती मिळण्यासाठी ०२०-२५५०२११०/६/७/८/९ हे हेल्पलाईन क्रमांक मागील वर्षांपासून अस्तित्वात आहे.मात्र गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा महापालिकेचे हे हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करण्यात अडचण येत आहे, तसेच बऱ्याचवेळा रिंग वाजते पण कुणी उचलत नाही यामुळे नागरिक त्रस्त आहे. 

याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, कोरोना रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती देण्याची सुविधा २४ तास सुरू असून साधारण ४ शिफ्टमध्ये काम चालते. अशावेळी रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून देण्याचाच आमचा प्रयत्न असतो. मात्र या महिन्यात दिवसाला जवळपास ४५० कॉल वाढले आहे.  त्यामुळे कुणीच हेल्पलाईन क्रमांकावर प्रतिसाद दिला नाही असे होणे शक्य नाही. 

डॉ. जीवन चौधरी म्हणाले, हेल्पलाईन क्रमांकाबाबत बाबत काही तांत्रिक अडचणी असू शकतात. मात्र, सध्याच्या घडीला सर्व रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून रुग्णांनी पूर्ण भरले आहे. त्यामुळे येणाऱ्या कॉलपैकी ६०टक्के  रुग्णांना बेड पुरविण्यात येत आहे. 

............

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर उपचार व बेड संदर्भात माहिती मिळण्याबाबत अडचण येत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे हेल्पलाईन क्रमांकासंबंधीची तांत्रिक समस्या दूर करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र पाठविले आहे. लवकरात लवकर ही अडचण दूर करून आणि नागरिकांना विना तक्रार हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल., - डॉ.अंजली साबणे.

Web Title: Corona patients 'no bed information'; Pune Municipal Corporation's 'Helpline' number just for the name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.