कोरोनाने लावला मंडप, फोटोग्राफर, डेकोरेशन व्यावसायिकांच्या पोटाला चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:37+5:302021-05-10T04:11:37+5:30
एप्रिल, मे महिना हा लग्नसराईचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या वर्षी ऐन फेब्रुवारी, मार्चमध्ये आलेले कोरोना विषाणूचे संकट ...
एप्रिल, मे महिना हा लग्नसराईचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या वर्षी ऐन फेब्रुवारी, मार्चमध्ये आलेले कोरोना विषाणूचे संकट यंदाही कायम असून यंदाही ऐन लग्नसराईत लॉकडाऊन झाल्याने मंडप व डेकोरेशनवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षीही मनासारखी कामे मिळत नसल्याने कोरोनामुळे पोटाला चिमटा घ्यायची वेळ मंडप, डेकोरेशन व फोटो - व्हिडिओ शूटिंग व्यावसायिकांवर आली आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कार्यक्रमातील गर्दी कमी करण्याकरिता प्रथम लॉकडाऊन व नंतर कमी गर्दीत किमान ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकण्याचे निर्बंध शासनाने घातले. त्यामुळे घरगुती कार्यक्रम घेऊन अनेक ठिकाणी लग्नकार्ये उरकण्यात आली. अनेक हौशी लोकांनी देखील कार्यक्रम साधेच केले. तर काहींनी मंगल कार्यालयात किमान लोकांच्या उपस्थित कार्यक्रम उरकले. या सर्वांचा परिणाम मंडप व्यावसायिकांवर झाला. हाताला रोजगार नसल्याने मंडप व्यवसायात मजूर म्हणून काम करणाऱ्या अनेक मजुरांची परवड होत असल्याचे मंडप व्यावसायिक सूर्यकांत (पिंटू) धुमाळ यांनी सांगितले.
डेकोरेशन, वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, वादक, घोडा व्यावसायिक यांना कामेच नसल्याने त्यांनी आता इतरत्र आपला मोर्चा वळवायला सुरुवात केली आहे.
लग्नकार्यात आचारी, वाढपी, वादक, बेंजो वादक यांना कामाची संधी मिळत असते. आपल्या कला-कौशल्याच्या जोरावर हे कलाकार आपल्या कुटुंबाचे पोट भरत असतात. मात्र, मिरवणुका, लग्नकार्ये यांवर बंधने आल्यामुळे या कलाकारांच्या आमदनीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या हातावर पोट असलेल्या मजुरांसाठी तसेच मंडप व्यावसायिक, फोटोग्राफर, डेकोरेशन करणारे यांसाठी किमान मदत जाहीर करावी अशी मागणी फ्लॉवर डेकोरेटर सूर्यकांत कांबळे व बँड व्यवसायी रामचंद्र माने यांनी केली आहे.
मागील वर्षी लग्नसराई सुरू होण्याआधी बँड, डीजे व फोटोग्राफर व्यावसायिकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून अत्याधुनिक साधनांची खरेदी केली. गेल्या दीड वर्षात या व्यावसायिकांना कामच नसल्याने कर्जाचे हप्त थकले आहेत. आत बँका, पतसंस्था वसुलीचा तगादा लावत आहेत. या व्यावसायिकांनी घरप्रपंच चालवायचा का कर्जाचे हप्त भरायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने या हातावर पोट असलेल्या कलाकारांचे कर्ज माफ करण्याची गरज आहे.
सागर शिंदे : फोटोग्राफर.