Corona positive news : दिलासादायक! पुण्यात दर दिवसाला ५० रुग्ण होताहेत ठणठणीत बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:39 PM2020-05-07T12:39:06+5:302020-05-07T12:46:47+5:30
गेल्या आठवड्यात ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त..
पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले असतानाच पुणेकरांसाठी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. दिवसाकाठी साधरणपणे ५० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत. गेल्या आठवड्यात ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासोबत पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत अॅक्टिव्ह केसेसचे (प्रत्यक्ष उपचार घेत असलेले) प्रमाण घटले आहे. एका आठवड्यात हे प्रमाण ७९ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
शहरामध्ये ९ मार्च रोजी राज्यातील पहिला रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ९ मार्च ते ६ मे या कालावधीत बधितांचा आकडा २ हजार २९ पर्यंत गेला आहे. या कालावधीत तब्बल ११८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी सहा टक्के आहे. मृत्यूदराचा आकडा सहा टक्के असल्याने हा आकडा आणखी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त असल्याचेही दिसून येत आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य व्याधींनी ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या मृत्यूची शक्यता अधिक असल्याने त्यांचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.
यामध्ये एक सकारात्मक बाब पूढे आली असून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या घटली आहे. २८ एप्रिल रोजी १३३९ पॉझिटिव्ह रुग्ण होते, तर १०५७ ?क्टिव्ह रुग्ण होते. हे प्रमाण ७९ टक्के होते. ०६ मे रोजीची आकडेवारी पहिली असता आठ दिवसात पॉझिटिव्ह केसेसमध्ये ६९० रूग्णांची भर पडून २०२९ पॉझिटिव्ह केसेस झाल्या. यापैकी १३२४ एक्टिव्ह केसेस आहेत. हे प्रमाण ६५ टक्के झाले आहे. म्हणजे एकाच आठवड्यात हे प्रमाण १४ टक्क्यांनी खाली आहे. उपचार घेऊन घरी परतणा?्यांचे प्रमाण वाढू लागल्याने एक्टिव्ह रूग्णांची संख्या घटत असल्याचे दिसत आहे.
------------------
पॉझिटिव्ह केसेसमध्ये गेल्या आठवड्यात दिवसाकाठी साधारणपणे ९० ने वाढ होत असल्याचे दिसत आहे. पालिकेने स्क्रिनिंग आणि अति संक्रमित भागात स्वॅब टेस्टिंग सुरू केले आहे. यासोबतच घरोघरी सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. २८ मार्च रोजी १२२ रुग्ण एकाच दिवसात वाढले होते. त्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १३३९ वर होता. ०६ मे रोजी आकडा २०२९ वर गेला आहे.
-------------------
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २८ एप्रिल रोजी ७९ होती. त्यामध्ये वाढ होत होत ०६ मे रोजी हा आकडा ११८ वर गेला आहे. या कालावधीतील आकडेवारी पहिली असता दिवसाकाठी ४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसते आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदराचे प्रमाण ६ टक्के आहे.
-------------------
मागील आठवड्याभरातील आकडेवारी पहिली असता दिवसाकाठी सर्वसाधारणपणे ५० रुग्ण दिवसाकाठी बरे होऊन घरी जात आहेत. एक्टिव्ह रूग्णांचे प्रमाण पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत घटले आहे. हे प्रमाण ६५ टक्क्यांवर आले आहे. ही सकारात्मक बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यासोबतच मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू आहेत.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका