कोरोनाग्रस्त महिला उपचारांविना खड्ड्यात पडून राहिली, लोकांनी पाठ फिरवली पण उपनगराध्यक्षाने दाखवली 'माणसुकी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:30 PM2021-05-08T20:30:34+5:302021-05-08T20:52:34+5:30
जुन्नर येथे महिला उपचाराविना बराच वेळ खड्ड्यात पडून राहिली, कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी 'माणसुकी'ही सोडली..
जुन्नर : कोरोना काळात अनेकदा माणुसकी कुठे शिल्लक आहे का नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. रुग्णालयापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्वच ठिकाणी रक्ताच्या नात्यांनी कोरोनाच्या भीतीने आपल्या माणसाकडे पाठ फिरवली. पण याचवेळी समाजात स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकी जपण्यासाठी अहोरात्र धरपडणारी असंख्य 'रिअल हिरो' अवतीभोवती पाहायला मिळाले. आणि कोरोनासारख्या बलाढ्य संकटाला टक्कर देण्याची हिंमतही समाजाला मिळत गेली. अशीच एक घटना जुन्नर येथे घडली. एकटी असणाऱ्या एका कोरोनाबाधित महिला मदतीसाठी कुणीही पुढे न आल्यामुळे बराच वेळ उपचाराविना एका खड्ड्यात पडून राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
जुन्नर शहरातील पंचलिंग मंदिराजवळ असलेल्या झोपडपट्टीमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र,तिच्यामुळे आपल्याला कोरोना होईल या भीतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी बराच काळ कोणीही पुढे आले नाही. बरेच तास ती विनाउपचार बेवारस अवस्थेत एका खड्ड्यात पडून राहिली. शेवटी जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी यांनी तिला स्वत: उचलुन पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील पंचलिंग मंदिराजवळ असलेल्या झोपडपट्टीमधील एका महिलेला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यावर तिने तपासणी करून घेतली. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेची तब्येत आणखी बिघडली. अशावेळी परिसरातीलनागरिकांनी विचारपूस करण्याची किंवा तिच्या उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यासाठी कोणतीही धावपळ केली नाही. संबंधित महिला एका खड्ड्याचा आधार घेत तिथेच पडून राहिली.
हा धक्कादायक प्रकार काही लोकांनी जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी यांच्या कानावर घातला. परदेशी यांनी त्यांचे सहकारी नवनाथ नेटकेसह तत्काळ रुग्णवाहिकासह घटनास्थळी धाव घेतली. आणि या अस्वस्थ महिलेला स्वतः उचलत पुढील उपचारासाठी संबंधित ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेची माहिती परिसरात ज्यावेळी वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांकडून परदेशी यांच्यावर त्यांनी दाखविलेल्या माणुसकीसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोविडच्या संकटात दिपेशसिंह परदेशी यांनी पहिल्यापासून सर्वतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी कोविड रूग्ण आणि नातेवाईकांना मोफत डबे ,प्लाझमा, आवश्यक ती औषधांसह कोणत्याही मदतीच्या पूर्ततेसाठी दिपेशसिंह परदेशी नेहमीच पुढे राहिले असल्याचे नागरिकांनी सांगितले.