इंदापूरमध्ये दोन दिवसांत कोरोना प्रतिबंध पथके सक्रिय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:24+5:302021-09-03T04:12:24+5:30
इंदापूर : इंदापूर तालुक्यात कोरोना बंधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामध्ये तालुक्याचे केंद्रस्थान असलेल्या इंदापूर शहरात नागरिकांची मोठी ...
इंदापूर : इंदापूर तालुक्यात कोरोना बंधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामध्ये तालुक्याचे केंद्रस्थान असलेल्या इंदापूर शहरात नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे. आपल्या सोबत इतरांचा अंतिम कार्यक्रम लावण्याचे काम काही नागरिक करीत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दिसत आहे. प्रशासनाची कोरोना प्रतिबंध पथके दोन दिवसांत सक्रिय होणार आहेत, असे प्रतिपादन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.
इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात गुरुवार (दि. २ सप्टेंबर) रोजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी राम राजे कापरे, पोलीस निरीक्षक मुजावर, नगरसेवक भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, आरोग्य सभापती अनिकेत वाघ, कर निरीक्षक वर्षा क्षीरसागर, सुजय मखरे, भागवत मखरे, उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार पाटील बोलत होते.
पुढे बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी आपल्याला प्रचंड नियोजन करावे लागेल. तिसरी लाट येणाऱ्या पूर्वी आपण त्याला रोखण्यासाठी सक्षम असणे गरजेचे आहे. मागील चार- पाच दिवसांत आपल्याकडे ८० च्या घरात कोविड बाधित रुग्ण असून कोणाच्या आरोग्याला आपण धोका करू नका. आपल्या कुटुंबाची आपण सुरक्षा घेतली पाहिजे. काहीजण वेळोवेळी सांगून देखील ऐकत नाहीत, त्यांना दंड करणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता खूपच महत्त्वाची आहे. सार्वजनिक ठिकाणी कठोर नियम लागू करणार आहोत. प्रसंगी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करावी, लागतील ते करावेच लागेल. असाही इशारा पाटील यांनी दिला.
या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, नरेंद्र गांधी, श्रीनिवास बानकर, राकेश गानबोटे, धरमचंद लोढा, केदार वाशिंबेकर, धीरज शहा, राजेंद्र हजारे, मुन्ना पेडियार, नितीन कुलकर्णी, प्रशांत इंगोले, दत्तात्रय अनपट व आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________________________________
चौकट : अचानक दुकानांवर भरारी पथकांची धाड पडणार
कोरोनाची लाट अजूनही ओसरलेली नाही. नागरिकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. इंदापूर शहरातील बाजरपेठेत व्यापाऱ्यांनी विनामास्क वावरू नये. दुकानात सॅनिटायझरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. विनामास्क खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहकाला सामान देऊ नका, त्यांना मास्क घालण्याची विनंती करा. आपल्या दुकानात अचानक भरारी पथकांची धाड पडू शकते. आपल्याला शासकीय दंड होऊ शकतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.
___________________________________________________
फोटो ओळ : इंदापूर नगरपरिषद सभागृहात बैठकीत बोलताना तहसीलदार श्रीकांत पाटील व इतर.