Corona Pune Breaking : पुण्यातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख पुढील तीन महिने कायम राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:37 PM2020-09-04T17:37:33+5:302020-09-04T17:42:37+5:30
गेल्या सहा महिन्यांत पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय, मात्र मृत्यूदर कमी होतोय..
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : पुण्यात ९ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर आज सहा महिन्यांनी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या जवळ येऊन ठेपली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये मृत्यूदर कमी होत आहे. एप्रिलमध्ये शहराचा मृत्यूदर ५.५९ टक्के इतका होता, तर ऑगस्टमध्ये मृत्यूदर २.४१ टक्कयांवर आला आहे. याचाच अर्थ १०० लोकांपैकी कोरोनाने २ लोकांचा मृत्यू होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि कमी होणारा मृत्यूदर असा पॅटर्न सध्या पुणे शहरात पाहायला मिळत आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये रुग्णसंख्या अजून वाढतच जाणार आहे. किमान नोव्हेंबरपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख चढता राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेकडून प्राप्त होत असलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च रोजी पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ होती, तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. ३० एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या १५१८ आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८५ होती. त्यानंतर हे दोन्ही आकडे झपाट्याने वाढत गेले. ३१ ऑगस्ट रोजी रुग्णसंख्या ९५ हजारांच्या घरात येऊन पोहोचली. सक्रिय रुग्णांची संख्या जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी झाली आहे.
वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना, धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता, नागरिकांचा प्रतिसाद या बाबी महत्वाची भूमिका बजावत आहेत. अनलॉक-४ मध्ये शाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे असे काही अपवाद वगळता सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्या वाढत जाणार आहे. प्रत्येक लॉकडाऊनचा परिणाम साधारणपणे १० दिवसांनी पहायला मिळाला. लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या कमी होत गेली आणि गर्दी वाढू लागल्यावर रुग्णसंख्या वाढली. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडे कासवाच्या गतीने वाढणारी व्हेंटिलेटर, बेडची संख्या हे प्रमाण पाहता बेशिस्त आणि निष्काळजी वर्तन, अतिआत्मविश्वासाने विनाकारण गर्दी करण्याची सवय आणि लक्षणे दिसूनही चाचणी करुन न घेण्याची मानसिकता यामुळे आपण आपला आणि पर्यायाने समाजाचा घात तर करत नाही ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
---------------------------
स्वयंशिस्त ही एकमेव उपाययोजना असल्याचे पहिल्या दिवसापासून सांगितले जात आहे आणि हे वास्तव अजूनही लोकांच्या पचनी पडलेले नाही. गणेशोत्सवाच्या काळातही अनेकांनी अतिउत्साह दाखवला. त्याचा परिणाम वाढत्या रुग्णसंख्येवर झाल्याचे पुढील आठवड्याभरात पहायला मिळेल. आपली आरोग्य व्यवस्था पणाला लागली आहेत. अनेक जण हॉस्पिटलपर्यंत पोहोचूही शकत नाही, अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. रुग्णसंख्येचा आलेख खाली येऊन पुन्हा वर गेल्यास ‘पीक’ येऊन गेला असे म्हणता येऊ शकते. पुण्यातील रुग्णसंख्या आजतागायत वाढतीच आहे आणि पुढील तीन-चार महिने वाढतच राहणार आहे. रुग्णसंख्या कमी असताना लोक घरात बसले होते आणि आता संख्या वाढत असताना बिनधास्त घराबाहेर फिरत आहेत. शिस्त पाळल्याशिवाय ही परिस्थिती नियंत्रणात येणार नाही.
- डॉ. विजय नटराजन, संचालक, सिंबायोसिस युनिर्व्हसिटी हॉस्पिटल
----------------------------
इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील चाचण्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. जास्त चाचण्या केल्या की जास्त रुग्णसंख्या, असे हे गणित आहे. ४० लाख लोकांच्या टेस्ट केल्या तर १० लाख लोकही कोरोनाबाधित असू शकतात. मृत्यूदर कमी होत असला तरी त्याचा वेग मात्र कमी आहे. मृत्यूदर वेगाने कमी करायचा असेल तर ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. आता शासकीय आरोग्य यंत्रणा थकली आहे. खाजगी डॉक्टर, गणेश मंडळे यांनी आरोग्य व्यवस्थेला साथ देण्याची गरज आहे. अजून किमान दोन महिने रुग्णसंख्या वाढत राहणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी मला काहीच होणार नाही, ही वृत्ती बाजूला ठेवली पाहिजे. मास्क वापरणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे.
- डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य सल्लागार, महाराष्ट्र राज्य
------------------------------
सोसायट्यांमध्ये वाढतेय रुग्णसंख्या
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात झोपडपट्टया, दाटीवाटीच्या वसाहतींमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत होती. पुण्यात ताडीवाला रस्ता, भवानी पेठ, घोले रस्ता, कासेवाडी असे भाग वेगाने हॉटस्पॉट ठरले. मात्र, आता परिस्थिती वेगाने बदलली आहे. सध्याची रुग्णसंख्या सोसायट्या, उच्चभ्रू वस्ती अशा ठिकाणी वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोक घराबाहेर पडत नव्हते. अनलॉकमध्ये नागरिक घराबाहेर पडू लागले, एकमेकांशी संपर्क वाढला आणि कोरोनाने सर्वच ठिकाणी शिरकाव केला आहे.