पिंपरीत कोरोनाने टेन्शन वाढवलं! ३७० मायक्रो झोन तरी सात दिवसांत ३ हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:45 PM2021-03-06T17:45:39+5:302021-03-06T18:30:01+5:30
सद्य स्थितीत शहरात ९५ मेजर कंटेन्मेंट झोेन आहेत, तर ३७० मायक्रो कंटेन्मेंट झोेन आहेत.
पिंपरी : शहरात फेब्रुवारीपासून सुरू झालेली कोरोना रुग्णांची वाढ ही सुरूच आहे. शहरात २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या सात दिवसांत २,९२१ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. शहरात उपचार घेत असलेल्या २५ रुग्णांचा या सात दिवसात मृत्यू झाला आहे. परंतु, आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेली आहे, असे महापलिका वैद्यकीय विभागाने सांगितले.
सध्या शहरात ४२६३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १२४१ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर ३०२२ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैकी जवळपास ७० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. शहराचा सध्या पॉझिटिव्हीटी रेट हा १७ असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने माहिपालिकने रोजच्या तपासणीत वाढ केली आहे. शहरात रोज सरासरी २५०० तपासण्या केल्या जात आहेत.
नोव्हेंबरनंतर शहरात रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे कोरोना आता संपला असे वाटत असताना पुन्हा अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीत शहरात ३६९७ रुग्ण आढळून आले होते, तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीत ५४१२ रुग्णांची नोंद झाली आणि ४७ रुग्णांचा मृत्यू झाला. काही दिवसापूर्वी रुग्ण संख्या वाढत असली, तरी मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र, ४ आणि ५ फेब्रुवारीला शहरात प्रत्येकी ४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत शहरात ९५ मेजर कंटेन्मेंट झोेन आहेत, तर ३७० मायक्रो कंटेन्मेंट झोेन आहेत.
रुग्ण वाढ लक्षात घेता महापालिकने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांवर वॉच ठेवण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे, एका रुग्ण आढळल्यास १२ ते १६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.
---
वायसीएम लॅब २४ तास उपलब्ध
रुग्ण संख्या वाढल्याने तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व चाचण्यांचे अहवाल तपासण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या लॅबमध्ये पाठविले जातात. अहवालाची प्रतिक्षा कमी व्हावी आणि लवकर अहवाल मिळावा म्हणून वायसीएमची लॅब २४ कार्यान्वित करण्यात आली आहे.
---
सध्या शहराचा पॉझिटिव्ही रेट हा १७ टक्के आहे. रोज होणाऱ्या चाचण्यांवरून पॉझिटिव्ही रेट कमी जास्त होत असतो. सद्यस्थितीत पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. नियमांचे उल्लघन होणार नाही, या करीता उपाय योजना केल्या जात आहे.
- राजेश पाटील, आयुक्त महापालिका
--
रुग्ण संख्येत वाढ होत, असती तरी आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सर्वाधिक आहेत. गंभीर लक्षणे असलेले रुग्ण कमी आहेत. सध्या शहराचा १७ टक्के पॉझिटिव्ही रेट आहे.
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका
--
सात दिवसात झालेल्या तपासण्या
तारीख तपासण्या रुग्ण
२७ फेब्रुवारी ६५३ ३७०
२८ फेब्रुवारी २३२१ ४२३
१ मार्च १९०३ २५३
२ मार्च २७२७ २८८
३ मार्च ३८३२ ४८३
४ मार्च २३१७ ५०२
५ मार्च ३११८ ६०२