चीनमधून परतलेल्या चौघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह मात्र, चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 09:01 PM2020-02-02T21:01:22+5:302020-02-02T21:03:26+5:30
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे. या भागातून पुण्यात परतलेल्या काही जणांमध्ये सर्दी, खोकला,ताप ही लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी नायडू रुग्णालयात विलीगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
पुणे : चीनमधून परतलेल्या चौघांना सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे आढळून आल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुन्यांची तपासणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या रुग्णालयामध्ये आणखी चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे. या भागातून पुण्यात परतलेल्या काही जणांमध्ये सर्दी, खोकला,ताप ही लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी नायडू रुग्णालयात विलीगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आतापर्यंत या कक्षामध्ये आठ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने राष्ट्रीय विषाण संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांच्या एका नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच जणांचे नमुने दुसºयांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित नमुने प्राप्त झालेले नाहीत. अहवाल निगेटिव्ह आलेल्या चार जणांना रुग्णायातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयात चार जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रुग्णालयात शनिवारी व रविवारी प्रत्येकी एका संशयित रुग्णाला दाखल करण्यात आले. एक ४२ वर्षीय पुरूष प्रवाशाने दि. १५ ते १८ जानेवारी या कालावधीत शांघायमध्ये प्रवास केला आहे. त्यांना दि. २० जानेवारीपासून खोकल्याचा त्रास होत आहे. त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दि. ५ ते २५ जानेवारी या कालावधीत शांघायमध्ये प्रवास केलेल्या २७ वर्षीय तरुणाला मागील पाच दिवसांपासून ताप व खोकल्याचा त्रास होत असून त्यांना रविवारी दाखल करण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.