पुण्यामध्ये सामान्यांवर निर्बंध, हॉटेलमध्ये पार्ट्या मात्र बेधुंद; नियम पायदळी तुडवत गुरु रंधवाचा लाईव्ह शो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:11 PM2022-01-10T12:11:42+5:302022-01-10T12:16:44+5:30
पुणे : कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुण्यासह महाराष्ट्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल केला ...
पुणे : कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुण्यासह महाराष्ट्रात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्याकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र हॉटेलमध्ये बेधुंद पार्ट्या सुरू आहेत. पुण्यातील हॉटेल कॉनराड येथे शनिवारी रात्री संगीतकार, गीतकार आणि गायक गुरु रंधावा याचा लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. शेकडोंच्या उपस्थितीत झालेल्या या पार्टीत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले.
मंगलदास रोडवरील कॉनराड या पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी नमन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती असे सांगण्यात आले. या पार्टीत गुरु रंधावा याने आपली गाणी सादर केली. त्यावेळी मोठ्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते. बहुतांश जणांनी मास्कही परिधान केले नव्हते. २०० हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुरु रंधावा याच्या गाण्यावर शेकडो तरुण नाचत होते. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी चालली होती. मात्र, पोलिसांकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. त्यामध्ये ५० जणांचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. याबाबत हॉटेलचे सरव्यवस्थापक अमित मिधा यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगितले. हॉटेलमधील रिस्पेशनला चौकशी केली असता त्यांनी शनिवारी रात्री गुरु रंधवा याचा कार्यक्रम झाल्याचे सांगितले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात चौकशी केली असता याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनीही याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले
पुण्यातील अनेक हॉटेलांमध्ये रात्रीच्या पार्ट्या, पोलीस अनभिज्ञ की जाणूनबुजून दुर्लक्ष
पुण्यातील अनेक हॉटेलांमध्ये रात्रीच्या पार्ट्या सुरू आहेत. शनिवारी रात्रीही अनेक हॉटेलांमध्ये या पार्ट्या सुरू होत्या. पोलीस याबाबत अनभिज्ञ की जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोरेगाव पार्क येथील वॉटर रेस्टॉरंटमध्येही शनिवारी अशीच एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. याबाबतही पोलिसांकडे कोणतीही माहिती नव्हती.