जिल्ह्यात कोरोना निर्बंध ‘जैसे थे’; शहरात दिलास मिळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:08+5:302021-07-31T04:10:08+5:30
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच ‘पॉझिटिव्हिटी रेट’ नियंत्रणात असला तरी कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात ...
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच ‘पॉझिटिव्हिटी रेट’ नियंत्रणात असला तरी कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध जसेच्या तसे ठेवण्याचा निर्णय शुक्रवारच्या (दि. ३०) प्रशासकीय आढावा बैठकीत घेण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना या वेळी देण्यात आली.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत बैठक झाली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.
वळसे पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेऊन मनुष्यबळ वाढवण्याची सूचना केली. ते म्हणाले, “औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेऊन कामगारांचे लसीकरण वेळेत करण्यासाठी कक्ष स्थापन करा. लसीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या शासनाच्या सूचनांचे पालन करा. कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करा.” निर्बंध कमी करण्यासंदर्भात तसेच दुकानांच्या वेळा वाढवण्याबद्दल मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाशी चर्चा करणार असल्याचे सांगून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. आमदार माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, चेतन तुपे, सुनील शेळके, संजय जगताप, राहुल कुल तसेच डॉ. सुभाष साळुंखे यांनी या वेळी काही सूचना केल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात असणाऱ्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.