बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना कोरोना निर्बंधांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:10+5:302021-05-18T04:10:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरिपाच्या हंगामासाठी बियाणे खरेदी करताना कोरोना निर्बंधाने दुकाने ११ वाजताच बंद होत असल्याने शेतकऱ्यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरिपाच्या हंगामासाठी बियाणे खरेदी करताना कोरोना निर्बंधाने दुकाने ११ वाजताच बंद होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी यात शेतकऱ्यांची मदत करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले आहे.
मुख्य रस्त्यापासून दूर गावात वाडी वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी लवकर येणे शक्य होत नाही. सकाळी ११ वाजता दुकाने बंद होत असल्याने त्यांना बियाणे खरेदी करता येत नाही, असे जिल्ह्याच्या दौऱ्यात निदर्शनास आल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.
यावर उपाय म्हणून तालुक्यातील तसेच गाव स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांना दुकानदार व शेतकरी यांच्यात समनव्य साधण्याचे काम करण्यास सांगितल्याची माहिती बोटे यांनी दिली. गावातील शेतकऱ्यांची एकत्रित मागणी नोंदवून दुकानदाराला तो सर्व माल स्वतंत्र गाडीने संबधित गाव किंवा वस्तीवर पोहोचविण्यास सांगण्याचे काम कृषी अधिकाऱ्यांनी करायचे आहे.
जिल्ह्याला वेगवेगळ्या प्रकारची २६ हजार क्विंटल बियाणे खरीपासाठी लागतात. सध्या जिल्ह्यात ४ हजार क्विंटल बियाणे शिल्लक आहे. अवकाळी पाऊस, दुकानांच्या वेळा, कोरोनाचा प्रकोप अशा विविध कारणांमुळे बियाणांना अपेक्षित उठाव नाही. शेतकऱ्यांना हवे ते बियाणे आहे त्याच दरात थेट गावात उपलब्ध करून दिले तर मागणी वाढेल, असा विश्वास बोटे यांंनी व्यक्त केला.