कोरोना निर्बंधांमुळे भाजी विक्रीस बसतोय फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:14+5:302021-07-15T04:10:14+5:30
कोरोना निर्बंधचा परिणाम : माल गाळ्यावर पडून राहतोय पुणे : कोरोनाच्या निर्बंधांमुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागातील भाजी विक्रीला फटका ...
कोरोना निर्बंधचा परिणाम : माल गाळ्यावर पडून राहतोय
पुणे : कोरोनाच्या निर्बंधांमुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागातील भाजी विक्रीला फटका बसत आहे. दोन-दोन दिवस माल पडून राहत आहे. त्याचबरोबर भाजीविक्रीत सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. तर काही गाळाधारकांना माल फेकून द्यावा लागत आहे. परिणामी व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.
हॉटेल, रेस्टॉरंट दुपारी ४ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू आहेत. रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल व्यावसायिकांना पार्सल विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र, किरकोळ विक्रेते मार्केट यार्डातील घाऊक बाजारातून माल घेऊन शहरातील विविध किरकोळ विक्री करतात. त्यांना आता दुपारी चारपर्यंतच माल विकण्यास परवानगी आहे. त्यामुळे ते कमी माल खरेदी करतात. तर हॉटेल, रेस्टॉरंट चालकाकडून भाज्यांना अपेक्षित मागणी नाही.
शाळा, कॉलेज सुरू नसल्याने विद्यार्थी परगावी गेले आहेत. त्यामुळे खानावळी बंद आहेत. त्यामुळे भाजीला मागणी कमी आहे. परिणामी विक्री अभावी माल शिल्लक राहत आहे.
लसूण, भेंडी, गवार, दोडका, हिरवी मिरची, दुधी भोपळा, काकडी, कारली, फ्लॉवर, कोबी, वांगी शेवगा आणि गाजर या भाज्यांच्या भावात रविवारच्या (दि. ११) तुलनेत बुधवारी (दि.१४) १० ते ३० टक्के घट झाली आहे.
----
कोट
किरकोळ विक्रेत्यांना दुपारी चार वाजेपर्यंतच भाजीपाला विकण्यास परवानगी आहे. त्यामुळे ते कमी प्रमाणात भाज्यांची खरेदी करत आहेत. किमान भाज्यांना तरी सायंकाळी ७ वाजेपर्यंत विकण्यास परवानगी दिली पाहिजे. हॉटेल व्यवसाय सायंकाळी, रात्री होत असतो. अटी, शर्तीचे पालन करून २५ टक्के क्षमतेने हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली पाहिजे. जेणेकरून भाजीपाल्याचा खप वाढेल.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन
----
फळभाज्यांचे घाऊक बाजारातील दहा किलोचे भाव
सुरूवातीचे रविवार (दि. ११) आणि कंसातील बुधवार (दि. १४)
लसूण : ३००-१००० (७५०-८००), भेंडी : १००-२०० (८०-१२०), गवार : गावरान व सुरती १५०-२५० (१००-१२०), दोडका : १५०-२०० (१४०-१६०), हिरवी मिरची : ४००-४५० (२५०-३००), दुधी भोपळा : १२०-१६० (८०-१२०), काकडी : १००-१५० (८०-१००), कारली : हिरवी १५०-२०० (१२०-१६०) फ्लॉवर : ६०-८० (३०-६०), कोबी : १००-१५० (६०-१००), वांगी : १००-२०० (८०-१२०), शेवगा : ४००-४५० (२८०-३५०) , गाजर : २००-२२० (१४०-१६०).
फोटो : कोरोना निर्बंधांमुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागातील गाळ्यांवर दोन-दोन दिवस माल विकला जात नसल्याने पडून राहत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
फोटो - भाजी