पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंध अधिक कडक होणार? अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:33 PM2022-01-03T19:33:41+5:302022-01-03T19:36:56+5:30
कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर शासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत
पुणे : Pune Corona Update| गेल्या आठ दिवसांत पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाटयाने वाढत आहे. सोमवारी एका दिवसात जिल्ह्यात तब्बल 850 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली. ही वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी तातडीने मंगळवार (दि.4) रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक आयोजित केली आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर शासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. सध्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेली रुग्ण संख्या लक्षात घेता यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर सध्या शहर आणि ग्रामीण भागात बहुतेक शाळा- महाविद्यालय देखील सुरू आहेत. मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात निर्णय होऊ शकतो. यामुळेच या बैठकीकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे मंगळवार 4 जानेवारी 2022 रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून, सकाळी 9.15 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी बुद्रुक येथे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आगमन. सायंकाळी 4.30 वाजता कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा बैठक घेणार.