Corona Rules: कारमधून जाताना मास्क घालायचा कि नाही; नागरिक गोत्यात अन् पोलीस संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 13:05 IST2022-01-09T13:05:46+5:302022-01-09T13:05:55+5:30
मोटारीतून जाताना मास्क नसल्यास कारवाई करायची की नाही याबाबत सध्या पोलिसांत संभ्रम आहे. त्यामुळे पोलीस सध्या कारवाई करण्याऐवजी जनजागृती करत आहेत.

Corona Rules: कारमधून जाताना मास्क घालायचा कि नाही; नागरिक गोत्यात अन् पोलीस संभ्रमात
पुणे : मोटारीतून जाताना मास्क नसल्यास कारवाई करायची की नाही याबाबत सध्या पोलिसांत संभ्रम आहे. त्यामुळे पोलीस सध्या कारवाई करण्याऐवजी जनजागृती करत आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरताना विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसात दीड हजारांहून अधिक नागरिकांवर विनामास्क असल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र विनामास्क नागरिकांवर कारवाई सुरु झाली असतानाच पहिल्या लाटेप्रमाणे मोटारीतून जाणाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोटारीतून एकटा जात असतानाही मास्क लावला नाही, म्हणून पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर कारमधून मोटारीतून जात असेल तर, मास्क लावला नसेल तरी चालेल़, मात्र, कारमधून बाहेर आल्यावर चालकाने मास्क लावणे बंधनकारक असल्याचा आदेश पहिल्या लाटेच्या वेळी शहर पोलिसांनी काढले होते.
आता कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनामास्क असणाऱ्यांवर पुन्हा कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आता विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश शहर पोलीस दलाने काढले आहेत.
रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरु झाली आहे. असे असले तरी सुरुवातीला पोलिसांनी अनेकांना समजावून सांगण्यावर भर दिला आहे. रस्त्यावर अनेकजण मास्क लावतात, परंतु, तो अनेकदा हनुवटीखाली असतो. केवळ दाखविण्यापुरता लावलेला असतो. पायी जाणारे, दुचाकीस्वार अनेकजण अशा प्रकारे जाताना दिसून येत होते. त्यांना थांबवून मास्क व्यवस्थित घालण्यास सांगण्यात येत होते. कारमधून जाणाऱ्यांनी मास्क घातला नसेल, तर त्यांनाही थांबवून मास्कचा वापर करण्यास सांगण्यात येत होते. शिवाजी रोडवर केवळ एकट्या असलेल्या कारचालकाला थांबवून मास्क हनुवटीवर न ठेवता कानावर घालण्यास सांगण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी चालकांनी गाडी थांबवून मास्क वापरण्यास सांगितले जात होते.