पुणे शहरातील व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांची होणार कोरोना तपासणी; महापालिकेची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:03 PM2020-05-27T19:03:14+5:302020-05-27T19:17:43+5:30
जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू हे ६१ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झालेले आहेत
पुणे : कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण कोरोनामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना होणारा संभाव्य धोका टाळण्याकरिता महापालिका विशेष मोहीम राबविणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी केली जाणार आहे.
पुणे शहरात प्रमाणावर कोविड - १९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही विभागामध्ये पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण पाचबते साडेपाच टक्के आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ ८९ टक्के मृत्यू एक किंवा एकापेक्षा जास्त व्याधी असलेल्या रूग्णांचे आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू हे ६१ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झालेले आहेत. तसेच २१ टक्के मृत्यू हे ५१ ते ६० वयोगटातील व्यक्तींचे झालेले आहेत. म्हणजेच ७७ टक्के मृत्यू हे ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे व १५ टक्के मृत्यू हे ४१ ते ५० वयोगटातील व्यक्तीचे झालेले आहेत. १४ टक्के मृत्यू हे २४ तासांच्या आत झालेले आहेत आणि १४ टक्के मृत्यू हे २४ ते ७२ तासांमध्ये झालेले आहेत. मृत्यूचे प्रमाण हे जेष्ठ नागरिक व इतर व्याधीग्रस्त व्यक्तींमध्ये जास्त आहे. त्यामुळे व्याधीग्रस्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. विशेषत: रक्तदाब, मधुमेह, अस्थमा अथवा क्षयरोग, मूत्रपिंड, लठ्ठपणा, कर्करोग यासारखे आजार असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. पालिका आता अशा ज्येष्ठांची यादी तयार करणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाची आणि शहारातील ज्येष्ठ नागरिक संघांची मदत घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाची मतदार यादी, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेची यादी, आरोग्य खात्याने केलेले सर्वेक्षण अशा महितीचीही मदत घेतली आहे.
----
१. प्रतिबंधित क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तींची यादी तयार केली जाणार.
२. इंडीयन मेडीकल असोसिएशन कडून शहरातील मधुमेह तज्ञ असोशिएशन, फिजीशियन असोशिएशन, युरॉलॉजी असोशिएशन, पल्मोनरी व चेस्ट तज्ञांची असोसिएशन तसेच लठ्ठपणा नियंत्रण करणारे तज्ञ यांची मदत घेणार.
३. प्रथम प्राधान्याने प्रतिबंधित क्षेत्रातील इतर व्याधीग्रस्त व जेष्ठ नागरिकांची नियमित आरोग्य तपासणीची व्यवस्था करणार
४. ज्येष्ठ व्यक्तीचे तापमान थर्मल गनने तपासले जाणार असून रक्तदाब घेणे, रक्तशर्करा, आॅक्सीजन सॅचूरेशन तपासण्यात येणार आहे.
५. आवश्यकता असल्यास संपूर्ण वैद्यकीय तपासणी व क्ष किरण तपासणी केली जाणार.
६. कोव्हीड - १९ ची काही लक्षणे (तापमान, घसा दुखणे, श्वासोच्छासाला त्रास होणे) दिसत असल्यास त्यांची चाचणी करणार
७. प्रतिबंधित क्षेत्रात अशा व्यक्तींची विशेष काळजी व त्यांच्या दैनंदिन नियंत्रण व नोंदी ठेवण्यात येणार
८. व्याधीग्रस्त व जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० व्यक्तींमागे एक अशी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार.