कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेत दुफळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:19+5:302021-04-04T04:10:19+5:30
पुणे : कोरोनावरून सरकार लादत असलेल्या निर्बंधांना उत्तर कसे द्यायचे, यावरून शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. मोर्चा ...
पुणे : कोरोनावरून सरकार लादत असलेल्या निर्बंधांना उत्तर कसे द्यायचे, यावरून शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. मोर्चा काढायचा की निवेदने द्यायची, यावरून मतभेद झाले असल्याचे समजते.
काही युवकांनी जुनी संघटना काही करत नसल्याची टीका करत नव्या संघटनेची स्थापना केली. जुन्या संघटनेचे मवाळ धोरण व्यवसायाला मारक ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शहरात अधिकृत ६ हजार, तर अनधिकृत किमान ४ हजार अशी १० हजार हॉटेल आहेत. त्यांची प्रतिनिधी म्हणून पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. गणेश शेट्टी त्याचे अध्यक्ष आहेत.
आता युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन ही आणखी एक संघटना तयार झाली आहे. अजिंक्य शिंदे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. कोरोना टाळेबंदीत हॉटेल व्यावसायिकांचे बरेच नुकसान झाले. काही हॉटेल बंद झाली, काहींचे कर्जाचे डोंगर वाढले. याविरोधात आपण मोर्चा काढू, आंदोलन करू असा तरूणांचा आग्रह होता. सरकारच्या विरोधात असे एकदम जाता येणार नाही, त्यामुळे निवेदन देऊ, मागणी करू, अधिकारी-पुढाऱ्यांची भेट घेऊ असे जुन्यांचे म्हणणे होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वाढू लागल्यावरही पहिली कुऱ्हाड हॉटेल व्यावसायिकांवर येणार हे निश्चित झाल्यानंतर हे मतभेद अधिक तीव्र झाले व दुफळी निर्माण झाली.