कोरोना अजूनही दारात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:18 AM2021-02-21T04:18:39+5:302021-02-21T04:18:39+5:30
पुणे : मास्क घातल्याने आमचा जीव गुदमरतो, आम्ही आमचे बघू, एवढे दिवस मास्क घालून काही उपयोग झाला का, अशी ...
पुणे : मास्क घातल्याने आमचा जीव गुदमरतो, आम्ही आमचे बघू, एवढे दिवस मास्क घालून काही उपयोग झाला का, अशी उत्तरे नागरिक देत असून, कोरोनाबाबत ते बेफिकिर असल्याचे दिसून आले. कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना अजूनही दारात असून, नियम न पाळल्यास घरात बसायची वेळ पुन्हा येऊ शकते. म्हणून कोरोनाबाबतचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या तीन, चार दिवसांपासून राज्यासहित पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. तसेच प्रशासनाने बंधने शिथिल करून सर्व गोष्टी सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु मास्क बंधनकारक ठेवण्यात आले होते. बंधने शिथिल झाल्याने काही नागरिकांनी मास्क घालणे बंद केले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गर्दीच्या ठिकाणी, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आणि प्रमुख चौकात पाहणी केली.
----------------
प्रमुख चौक
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा प्रमुख चौकात रिक्षा स्टँड, बस, एसटी वाहतूक, खाद्यपदार्थ गाड्या, अशी सर्व प्रकारची वर्दळ असते. सर्व गोष्टी चालू झाल्याने दिवसभर या भागात गर्दी दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. अशा चौकात असणारे रिक्षाचालक विनामास्क थांबलेले दिसून आले. त्यांना मास्क घाला असे सांगितल्यावर, आम्ही आमचे बघू असे उत्तर ऐकवण्यात आले. काही खाद्यपदार्थ गाड्यांवर विक्रेते स्वतः मास्क घालत नसल्याचे चित्र होते.
-----------
चिंचोळ्या गल्ली
शहरात मध्यवर्ती भागात अनेक चिंचोळ्या गल्ली आहेत. एखाद्या गल्लीत १००, २०० मीटरच्या अंतरावर ५० लोकांमागे १० ते १५ नागरिकांनी मास्क न घातल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक दुकानांमध्ये विक्रेते एका ठिकाणी बसूनही मास्क न घालता व्यवसाय करत आहेत.
--------------
मंडई - तुळशीबागसारखी गर्दीची ठिकाणे
नागरिक गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तोंडाला मास्क न लावता गळ्याला मास्क लावतात. तसेच विक्रेतेही विनामास्क बसल्याचे दिसून आले.
…................
अनेक तरुण मंडळी वाहतुकीचे नियम मोडून फिरत असतात. अशा परिस्थितीतही ते विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रस्त्यावरून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विनामास्क फिरत आहेत. पोलिसांची कारवाई सुरू असली तरी नागरिक अजिबात घाबरत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
नागरिकांना मास्क का घालत नाही, असे विचारल्यावर मिळालेली उत्तरे
१) मास्क घातला म्हणून कोरोना होत नाही का
२) आताच जेवण झालाय, जरा आरामात बसलोय म्हणून घातला नाही.
३) श्वास घेता येत नाही, कान दुखतात.
४) एवढे दिवस मास्क घालून कोरोना कमी झाला आहे का
५) सरकार उगाच लोकांना घाबरवत आहे. मग आम्ही का मास्क घालू.