कोरोनामुळे वृद्धाश्रमातील देणग्यांचा ओघ आटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:03+5:302021-04-19T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले अहेत. त्यामुळे वृद्धाश्रमांसमोर देखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले अहेत. त्यामुळे वृद्धाश्रमांसमोर देखील वेगवेगळ्या आव्हानांचा डोंगर उभा ठाकला आहे. आजमितीला सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे ज्येष्ठांना या संक्रमण काळात जपणं. वृद्धाश्रमामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सातत्याने ज्येष्ठांना सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईजच्या सूचना देणं आणि त्याचे पालन करतायंत का नाही हे पाहाणं... नातेवाईकांशी संपर्क टाळणं... यामुळे काहीसे वैतागलेल्या ज्येष्ठांना लहान मुलासारखं समजावणं अशी तारेवरची कसरत वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे.
या काळात धान्य आणि आवश्यक वस्तुंच्या साठ्यातही घट झाली आहे आणि देणग्यांचा ओघही आटला आहे. त्यामुळे साहित्यांचा जपून वापर करण्याची वेळ वृद्धाश्रमांवर आली आहे. आजवर कधीही अशा स्वरूपाच्या संसर्गजन्य आजार न पाहिलेल्या ज्येष्ठांना देखील हा आजार पचवणं काहीस अवघड होत असल्याचं त्यांच्या संवादातून जाणावलं.
कुटुंबात एखादी ज्येष्ठ व्यक्ती असल्यास तिला सांभाळताना घरातील इतर सदस्यांची कसोटी लागते. मात्र एका वृस्द्धाश्रमात जेव्हा ४० ते ५० ज्येष्ठ व्यक्ती असतात तेव्हा त्यांना सांभाळण किती जिकरीचं असतं याचा प्रत्यय सध्या वृद्धाश्रमातील कर्मचारी घेत आहेत. वृद्धापकाळ म्हणजे अनुभवांची काठोकाठ भरलेली शिदोरी. कुणी काही जरी सांगायला गेले तरी मला नको सांगू, तुझ्यापेक्षा मी अधिक पावसाळे पाहिले आहेत, ही वाक्ये हमखास ठरलेली असतात. त्यांच्या दृष्टीने ते योग्य देखील असते. पण सध्याच्या स्थितीमध्ये स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे सांगताना आधी प्रश्नांचा भडीमारच सुरू होतो. पण खूप समजविल्यानंतर कुठंतरी ऐकतात. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळणं हेच आमच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, बहुतांश वृद्धाश्रम हे संस्थांच्या देणग्या किंवा कंपन्यांच्या सीएसआर निधीवर चालतात. तर कुणी रोख रक्क्कम देण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरूपात मदत करते. मात्र लॉकडाऊनच्या काळापासूनच देणग्यांचा ओघ काहीसा घटला आहे. पुरेसा निधी नसल्यामुळे धान्यासह अन्य वस्तुंच्या खरेदीवर मर्यादा आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
----
वृद्धाश्रमातील एकूण सदस्य संख्या (जागेच्या उपलब्धतेनुसार) अंदाजे ४५ ते ६० च्या आसपास
पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असते.
-----
भेट देणा-यांची संख्या शून्यावर
वृद्धाश्रमांना भेट देणाऱ्यांची संख्या महिन्याला किमान १५ ते २० इतकी असायची. मात्र, आता ही संख्या जवळपास शून्यावर आली आहे. शासनाने लागू केलेली संचारबंदी आणि ज्येष्ठांना संक्रमण होण्याची भीती लक्षात घेऊन नातेवाईकांना देखील भेटण्यास मनाई केल्याचं काही वृद्धाश्रमांकडून सांगण्यात आलं आहे.
--
वर्षभरात वृद्धाश्रमाला भेट देऊन लोक कांदे, बटाटे, धान्य, अक्रोड, बिस्किटे अशा स्वरूपात मदत करत असतात. मात्र सध्या संचारबंदीमुळे वृद्धाश्रमामध्ये येण्याचे लोकांचे प्रमाण कमीच झाले आहे. त्याच्या परिणास्वरूप मदतीचा ओघ घटला आहे. आम्ही कुणालाच त्यांना भेटू देत नाही- रमेश देवकुळे, मातोश्री वृद्धाश्रम
---
नारायण पेठ आणि भूगाव अशा दोन ठिकाणी आमचे ‘सहजीवन वृद्धनिवास’ आहेत. आम्ही सध्या व्हिजिटर्सना भेटायला मनाई केली आहे. केवळ आमचा कर्मचारी वर्ग येत आहे. केवळ बाहेरगावच्या लोकांना रविवारी भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र सर्व काळजी घेऊनच त्यांना भेटू दिले जाते. आम्हाला महिन्याला २५ ते ३० देणग्या मिळत होत्या. ते प्रमाण सध्या खूप कमी झाले आहे. ज्येष्ठ व्यक्ती कुणीही घाबरलेला नाहीये. केवळ लस घ्यावी का इतकेच प्रश्न विचारतात.
- डॉ. दिलीप देवधर, सहजीवन ट्रस्ट
---
सध्या वृद्धाश्रमामध्ये कुणीच व्यक्ती भेटायला येत नसल्यामुळे चुकचुकल्यासारखं वाटतं. एरवी खूप वर्दळ असायची. आमचे मुलांशी कधीतरी फक्त फोनवरूनच बोलणं होतं. आम्हाला त्यांची सारखी काळजी वाटत राहाते. आमच्या तब्येतीची काळजी घ्यायला डॉक्टर आणि इतर मंडळी आहेत. पण मुलांकडे कोण आहे? याची सतत चिंता वाटते.
- मालिनी शाळीग्राम (नाव बदलेले), ज्येष्ठ नागरिक