कोरोनाने रोखली पंढरीची वाट; पंढरीला जाणारा पायी सोहळा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 03:40 AM2020-05-30T03:40:13+5:302020-05-30T06:06:40+5:30
आतापर्यंत दोनदा वारी निघाली नाही; पण पालख्या पोहोचल्या
पुणे : भूकंप, ढगफुटी, धरणफुटी तसेच प्लेग, कॉलरासारखी साथ यासारख्या आपत्तींंना पाठीवर टाकून टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष करीत लाखो वारकऱ्यांना सोबत घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी भूवैकुंठ पंढरीला शेकडो वर्षांहून अधिक काळ न चुकता गेलेल्या आषाढी वारीची वाट यंदा कोरोनाने अडविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालखी सोहळ्यांचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत आषाढी वारीचा पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पादुका आषाढी वारीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला पंढरपूरला नेण्यासाठी वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमानाने घेऊन जाण्याचे पर्याय ठेवण्यात आले, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. पायी वारी नाही गेली तरी ‘माऊली’ची श्रीविठ्ठलाशी गळाभेट अशा प्रकारे घडविली जाणार आहे.
आषाढी वारी म्हणजे, आनंदे नाचत पंढरीशी जाणारा वैष्णवांचा महामेळा! हा मºहाटी संस्कृतीचा ठेवा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या सोहळ्याचे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ‘वारी चुकू न दे हरी!’ ही समस्त वारकरी संप्रदायाची भावना होती.
350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला नेली. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली, अशी मााहिती जाणकारांनी दिली.
50 हून अधिक पालख्या दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्या महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी १० लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात असतात.
1889 मध्ये प्लेगचा कहर झाला होता तेव्हा वारी निघाली नाही. नंतर १९१८मध्ये फ्लूची मोठी साथ होती, तेव्हाही वारी निघाली नव्हती. मात्र, याबाबत देहू, आळंदी किंवा पंढरपूरमध्ये कसलीही नोंद उपलब्ध नाही.