कोरोनाबाधितांना हव्यात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:29+5:302021-05-13T04:12:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जम्बो हॉस्पिटल सर्वसामान्य कोरोनाबाधितांना मोफत उपचारासाठी महापालिकेने सुरू केले. पण येथील काही रुग्ण त्याची ...

Corona sufferers need tobacco, gutkha powder | कोरोनाबाधितांना हव्यात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या

कोरोनाबाधितांना हव्यात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जम्बो हॉस्पिटल सर्वसामान्य कोरोनाबाधितांना मोफत उपचारासाठी महापालिकेने सुरू केले. पण येथील काही रुग्ण त्याची कदर न करता, उपचार घेतानाही तंबाखू, गुटखा एवढेच नव्हे तर दारूचेही व्यसन करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे सगेसोयरेच रुग्णांच्या व्यसनांची इच्छा पुरवण्यात पुढाकार घेत आहेत. नशेचे पदार्थ रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी जेवणाच्या डब्यांपासून ते पँट, कपड्यांमध्ये लपवण्यापर्यंतच्या युक्त्या केल्या जात होत्या. चक्क पँटच्या बॉटममध्ये तंबाखू व चुना पुडी शिलाई करून पुरवण्याचाही कळस केल्याचे उघड झाले आहे.

जम्बो हॉस्पिटलमधील या प्रकारांमुळे सर्वच जण आवाक झाले असून, उपचार घेताना तरी दहा दिवस व्यसने कशासाठी करता असा प्रश्न करत म्हणून प्रशासन, डॉक्टर, परिचारिका या सर्वांनीच डोक्याला हात लावला आहे. परिणामी जम्बो हॉस्पिटलमधील रुग्णांना पाठविण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तू आता बारकाईने तपासण्याची नसती उठाठेव हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षकांच्या मागे लागली आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करणाऱ्या रुग्णांना खाद्यपदार्थ, कपडे पुरविण्यासाठीही संबंधितांच्या नातेवाईकांना तपासणीच्या रांगेत तासन् तास थांबावे लागत आहे़

जम्बो हॉस्पिटलमध्ये सध्या ३३९ रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून ५७ जण आयसीयूमध्ये आहेत. तर ९१ जणांवर एचडीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पण यातील काही रूग्ण उपचारांपेक्षा व्यसनांची तल्लफ भागवण्यास अधिक महत्व देत असल्याचे दिसून आले आहे. जेवणाच्या डब्यामध्ये वरच्या कप्प्यात वरणभात, चपाती, सर्वांत खालच्या कप्प्यात तंबाखू, गुटखा चुना डबी आढळून आली. घडी घातलेल्या शर्ट-पँटच्या खिशात, प्लॅस्टिकच्या पिशवीत तंबाखू, सुपारीही पाठविली जात होती़ विशेष म्हणजे सुपारीचे खांड फोडण्यासाठीचा अडकित्ताही एका रुग्णाला पाठवला गेला. गुटख्याच्या पुड्या, तंबाखू एवढ्यावर न थांबता चक्क एका रुग्णाला चाकू पाठविल्याचेही आढळून आले. या सर्व प्रकारांमुळे ‘जम्बो’तील सुरक्षा आणि तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.

चौकट

कोरोनाबाधितांकडून दारूची ही मागणी

जम्बो रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्डबॉयकडे ‘दारू आणून दे, तुला एक हजार रुपये देतो,’ अशी विनंती करणारे रुग्ण आढळून आले. गेल्या दोन दिवसांत अशी मागणी करणारे सात प्रकार उघडकीस आले. यामुळे रुग्णांना अशा प्रकारे मदत करणाऱ्या वॉर्डबॉय तथा अन्य कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिले आहेत.

चौकट

“जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना घरचा डबा देण्याची मुभा आहे. मात्र, काही रुग्णांचे नातेवाईक त्याचा गैरफायदा घेत आहेत. व्यसनाचे साहित्य रुग्णांना पुरविणे हे त्यांच्याच प्रकृतीसाठी घातक आहे. आम्ही तपासणी अधिक कडक केली आहे. नातेवाईकांनी गांभीर्याने विचार करावा.”

- राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो कोविड रुग्णालय तथा उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

------------------------------------------

फोटो मेल केला आहे़

Web Title: Corona sufferers need tobacco, gutkha powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.