Covishield चा पुरवठा बंद; बूस्टर डोससाठी केवळ कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:56 PM2022-10-18T21:56:04+5:302022-10-18T21:56:58+5:30
काॅर्बेव्हॅक्स लसीचा डाेस देण्यास शासनाची परवानगी देण्यात आली आहे...
पुणे : महापालिकेला दिले जाणारे सिरमच्या काेविशिल्ड या काेराेना प्रतिबंधक लसीचा पुरवठा गेल्या दीड महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारने बंद केला आहे. त्यामुळे सध्या महापालिकेकडे कोविशिल्डचे डोस उपलब्ध नाहीत. बूस्टर डोससाठी केवळ कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस उपलब्ध आहे. काेविशिल्डचा ज्यांना तिसरा डाेस घ्यायचा आहे त्यांना काॅर्बेव्हॅक्स लसीचा डाेस देण्यास शासनाची परवानगी देण्यात आली आहे.
याआधी केंद्र सरकार काेविशिल्ड लस खरेदी करत असे व ती राज्यांना देत असे. राज्य सरकार पुढे जिल्हा, महापालिकांना वितरित करत असत. त्यामुळे सर्वसामान्यांना ही लस सरकारी केंद्रांवर माेफत मिळत हाेती. मात्र,आता केंद्र शासनाने ही लस खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे या लसीचा स्टाॅकही संपला आहे. आता महापालिकेकडे कॉर्बेव्हॅक्स या लसीचे १०२० डोस शिल्लक असून ते २ नोव्हेंबर रोजी मुदतबाह्य होणार आहेत. सध्या कॉर्बेव्हॅक्स घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी असल्याने शिल्लक डोस वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एक्सपायरी डेट जवळ आलेल्या लसींची विल्हेवाट लावण्यासंदर्भात महापालिकेतर्फे राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे.
शहरातील बहुतांश नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस कोविशिल्डचा घेतला आहे. त्यापाठाेपाठ कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. आता सरकारकडून ‘कॉकटेल’ लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा डोस कोविशिल्डचा घेतला असला तरी बूस्टर डोससाठी कॉर्बेव्हॅक्स आणि कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महापालिकेकडे शिल्लक डाेस :
- कोव्हॅक्सिन ५ एमएल- ६ हजार २७० डोस,मुदतबाह्य दिनांक जानेवारी २०२३.
- कोव्हॅक्सिन १० एमएलचे -५ हजार ४० डोस,मुदतबाह्य दिनांक डिसेंबर २०२२.
महापालिकेला राज्याकडून काेविशिल्डचे डाेस मिळत नाहीत. तिसरा डाेस काॅर्बेव्हॅक्सचा देण्यास मान्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. पहिला आणि दुसरा डोस कोविशिल्डचा घेतला असला तरी तिसरा डोस कोव्हॅक्सिन किंवा कॉर्बेव्हॅक्स लसीचा घेता येणार आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर,लसीकरण अधिकारी,पुणे महापालिका