कोरोनाने माणसाला जीवनाचा धडा शिकविला : शेखर गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:30+5:302020-12-30T04:16:30+5:30
पुणे : “लॉकडाऊन काळात प्रशासनाने काम करताना आलेल्या अनुभवाबरोबरच समाजातील विविध घटकांवर झालेले परिणाम जवळून पाहिले. या काळात गरिबांचा ...
पुणे : “लॉकडाऊन काळात प्रशासनाने काम करताना आलेल्या अनुभवाबरोबरच समाजातील विविध घटकांवर झालेले परिणाम जवळून पाहिले. या काळात गरिबांचा कोंडमारा झाला तर श्रीमंतांचा गर्व उतरला. टोकाची संवेदनशीलता तर टोकाची अमानुषताही या काळात दिसली. कोरोनामुळे जग सर्वार्थाने बदलले असून, नवीन जीवनपद्धती निर्माण होत आहे. या महामारीने माणसाला जीवनाचा धडा शिकविला आहे,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
न्यू एरा पब्लिकेशन हाऊस व उचित माध्यम यांच्या वतीने ज्ञानेश्वर जाधवर लिखित ‘लॉकडाऊन’ कादंबरीचे प्रकाशन शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार अध्यक्षस्थानी होते. समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे, लेखक व प्रकाशक शरद तांदळे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, विद्यार्थी सहायक समितीचे विश्वस्त गणेश कळसकर, उचित माध्यमचे जीवराज चोले आदी यावेळी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, उद्योगात नुकसान झाले. आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागले. घरात बसून कोंडमारा झाला. यातून काहींनी साहित्यकृती निर्माण केल्या. नवे शिक्षण घेतले. ‘वर्क फॉर्म होम’मुळे लोक ग्रामीण भागाकडे वळू लागली. आपली संस्कृती, कुटुंबातील सदस्य नव्याने समजायला लागले. ‘लॉकडाऊन’ कादंबरी या सगळ्याचे दर्शन घडविणारी आहे. ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरी लेखनामागील भूमिका मांडली. शरद तांदळे यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी गायकवाड यांनी आभार मानले.
---------------