पालिका रुग्णालयात कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह अन् खासगीमध्ये येतेय निगेटिव्ह - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण- काळेपडळ येथील रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:54+5:302021-03-26T04:10:54+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये तपासणी केली, तर पॉझिटिव्ह येत आहे. तर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये तपासणी केली, तर पॉझिटिव्ह येत आहे. तर खासगी रुग्णालयामध्ये कोविडची तपासणी केली असता निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे महापालिका की खासगी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा, असा संभ्रम नागरिकांना पडला आहे. याबाबत महापालिकेच्या प्रशासनाने त्वरित कारवाई करून यंत्रणा सुधारावी, अशी मागणी होत आहे.
हडपसर गावातील एका महिलेची एका आजारात एक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यासाठी कोविड तपासणी करून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याप्रमाणे महापालिकेच्या काळेपडळ येथील कोविड सेंटरमध्ये शनिवारी तपासणी केली, त्याचा रिपोर्ट सोमवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल, तर कोविड रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार करून घ्या. अन्यथा त्रास होत नसेल, तर औषधे घेऊन जा आणि घरामध्ये क्वारन्टाइन व्हा, असे सांगितले.
दरम्यान, कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या नाहीत, तर तुमच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. मात्र, संबंधित रुग्णाने खासगी रुग्णालयातील कोविड तपासणी केली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तो रिपोर्ट पालिकेच्या आरोग्य विभागाला त्यांनी पाठविला. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील आलेल्या रिपोर्टवर नागरिकांनी विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाकडून दररोज कोरोनाबाधितांचे आकडे दाखविले जात आहेत, ते खरे आहेत की नाही, असा संभ्रम नागरिकांना पडला आहे.
-----------
खासगीत पैसे भरण्याचा भुर्दंड
नागरिकांमध्ये अगोदरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भीतीचे वातावरण असताना त्यात रिपोर्टचा घोळ अजून भर घालत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने याबाबत योग्य ती कार्यवाही करून संबंधित यंत्रणा योग्य काम करेल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिक महापालिकेच्या रूग्णालयातच जाणार नाहीत. खासगीमध्ये विनाकारण नागरिकांना पैसे भरून कोरोना टेस्ट करावी लागत आहे.
--------------