रस्त्यावर मोकार फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:33+5:302021-04-16T04:11:33+5:30
नीरा : रस्त्यावर मोकार फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार आणि त्यातील पॉॅझिटिव्ह आलेल्यांना कोरोना सेंटरमध्ये पाठविण्याचा इशारा जेजुरी पोलीस ठाण्याचे ...
नीरा : रस्त्यावर मोकार फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार आणि त्यातील पॉॅझिटिव्ह आलेल्यांना कोरोना सेंटरमध्ये पाठविण्याचा इशारा जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला आहे. तर संचारबंदीच्या काळात दुकाने अथवा आस्थापना उघडल्यास एक महिन्यासाठी सील करणार असल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.
ब्रेक द चेनच्या नव्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाडिक म्हणाले की, विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल. रस्त्यावर मोकार फिरतील त्यांची त्याच वेळी कोरोना चाचणी करण्याचे नियोजन आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना कोरोना सेंटरमध्ये पाठवले जाईल. विनाकारण फिरणाऱ्यांमुळेच कोरोनाचा प्रसार जास्त होतोय, अशा लोकांवर कडक कारवाईची गरज आहे.
तहसीलदार सरनोबत म्हणाल्या की, राज्य शासनाने ज्या आस्थापना ३० तारखे पर्यंत बंद ठेवायला सांगितले आहे त्या उघड्या ठेवलेल्या दिसल्यास त्यांच्यावर कलम १८८ प्रमाणे सक्त कारवाई होईल. या आस्थापना महिनाभरासाठी ही सील केल्या जाऊ शकतात. तसे आदेश देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
नीरा येथे कोरोना केअर सेंटर नीरा उभारण्यासाठीची जागाही तहसीलदारांनी पाहिली. ज्युबिलंट इंग्लिश स्कूल, नीरा कृषी उत्पन्न बाजार समीती गोडाऊन तसेच खंडाळा तालुक्यातील समता आश्रम शाळेची पाहणी यावेळी करण्यात अली. यानंतर नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात लॉकडाऊनच्या नव्या नियमावली संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीला सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका वैद्यकीय अधिकारी विवेक आबनावे, माजी उपसरपंच विजय शिंदे, अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, ग्रामसेवक मनोज डेरे, मंडलधिकारी संदीप चव्हाण, तलाठी बजरंग सोनवले, नीरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, मंगेश ढमाळ उपस्थित होते.
नीरा परिसरात कोरोना सेंटरची मागणी
पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. उपलब्ध कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. त्यामूळे आता नीरा व परिसरातील रुग्णांना कोरोनावर त्वरित उपचार मिळावेत म्हणून नीरा परिसरातच कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.
आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरणाची व्यवस्था
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी गर्दी होत आहे. ती टाळण्यासाठी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांवर लवकरच लसीकरण केले जाईल. मांडकी व गुळूंचे उपकेंद्रात कोरोना प्रतिंबंध लस उपलब्ध होणार असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.
फोटोओळ :
नीरा ग्रामपंचायत कार्यालयात लॉकडाऊनच्या नव्या नियमावली संदर्भात बैठकीत चर्चा करताना पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, नीरेचे ग्रामपंचायतीचे सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समिती.