पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:26 AM2022-12-03T06:26:58+5:302022-12-03T06:30:01+5:30
पाेलिसांनी ठपका ठेवूनही गुन्हा दाखल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ...
- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : काेराेनाकाळात शासनाकडून महापालिकेला काेराेना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटीजन किट’ प्रकरणात माेठा घाेटाळा उघडकीस आला आहे. वारजे येथील महापालिकेच्या डाॅ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बाेगस रुग्णांच्या नाेंदी केल्याचा व त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नाेंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घाेटाळ्यातून ३४ लाख रुपये या केंद्रावरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे वारजे माळवाडी पाेलिसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले असून, तसे पत्रही पाेलिसांनी महापालिकेला दिले आहे. तर, तक्रारदाराच्या मते ही रक्कम ८० ते ९० लाख रुपये आहे.
जेव्हा माणसांची जीवन मरणाशी झुंज सुरू हाेती, ज्यावेळी लाेक डाॅक्टरांना देव समजत हाेते, त्या काेराेनाकाळात हा भ्रष्टाचार घडल्याने पुण्याच्या महापालिकेच्या आराेग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या भ्रष्टाचाराला बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतीश काेळसुरे यांनी आराेग्य यंत्रणेकडे व पाेलिसांसह ३२ ठिकाणी तक्रार करत या प्रकरणाला वाचा फाेडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार व वारजे पाेलिसांच्या तपासानुसार या घाेटाळ्याचा ठपका वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील स्वॅब सेंटरचे प्रमुख डाॅ. ऋषिकेश गारडी तसेच महापालिकेचे आराेग्य प्रमुख डाॅ. आशिष भारती यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा वारजे पाेलिस ठाण्यातील तत्कालीन पाेलीस उपनिरीक्षक साेनाली कथले यांनी तपास करून त्याची पाळेमुळे खणली आहेत. त्यामध्ये बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान १८ हजार ५०० रॅपिड चाचण्या केल्याची नाेंद आहे. त्यापैकी वारजे पाेलिसांनी रँडम पद्धतीने १६५ जणांना संपर्क करून चाैकशी केली असता त्याद्वारे धक्कादायक गाेष्टी उघडकीस आल्या आहेत. १६५ पैकी फक्त १८ जणांनी या केंद्रावर काेराेना चाचणी केल्याचे सांगितले. तर ३७ जणांचा संपर्क झालेला नाही व ९ जणांनी फाेन उचलला नाही यांची संख्या ६४ आहे. या ६४ जणांची चाचणी झाली असे गृहीत धरून पाेलिसांनी १६५ मधून ६४ वजा करता १०१ म्हणजेच ६१ टक्के नाेंदी पाेलिसांच्या तपासात बाेगस आढळल्याची नाेंद केली आहे.
यावरून बारटक्के दवाखान्यात एकूण झालेल्या १८ हजार ५०० रॅपिड तपासण्यांपैकी ६१ टक्क्यांनुसार ११ हजार ३२४ नाेंदी बाेगस झाल्याची शक्यता व्यक्त करत प्रत्येक किटची किंमत ३०० रुपये याप्रमाणे एकूण ३३ लाख ९७ हजार रुपयांचा काळाबाजार झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. याचबराेबर पाेलिसांनी दवाखान्यातील ३३ स्टाफचे जबाबही नाेंदवले आहेत. त्या स्टाफपैकी २३ जणांचे माेबाइल क्रमांक बाेगस चाचण्यांसाठी वापरले आहेत. या चाैकशीचा गाेषवारा पाहिला असता तक्रारदार डाॅ. काेळसुरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असून, ते आराेपांशी पूरक आहेत व मनपाची फसवणूक झाल्याचे पाेलिसांनी नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर ही बाब गंभीर असून, याची चाैकशी करावी व नक्की किती रकमेची फसवणूक झाली याबाबत खातरजमा करून याबाबत पाेलिस ठाण्यात तक्रारी करावी, असा अहवाल वारजे पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आराेग्यप्रमुख डाॅ. आशिष भारती यांना २७ सप्टेंबरलाच पाठवला आहे. मात्र, याला दाेन महिने लाेटले तरीही आराेग्य विभागाकडून त्यावर काही एक कारवाई करण्यात आलेली नाही.
काय आहे रॅपिड अँटिजेन टेस्ट
संशयित रुग्णांचे काेराेना निदान करण्याचे दाेन प्रकार आहेत. एक म्हणजे घशातील स्वॅब घेऊन ताे ‘आरटीपीसीआर’ तपासणीसाठी पाठविण्यात येत हाेता. कालांतराने काेराेना निदान करण्यासाठी महापालिकेकडे ‘रॅपिड अँटिजेन किट’ आल्या. यामध्ये रुग्णाच्या नाकातील स्वॅब घेऊन ताे या किटवर ठेवल्यास ताे रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह आहे का नाही हे अर्ध्या तासात समजत हाेते. या किटमुळे रुग्णाचे तत्काळ निदान व उपचार हाेण्यास मदत झाली.
या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून एक किट जवळपास अडीच ते पाच हजार रुपयांपर्यंत विकले आहे. त्यामुळे हा घाेटाळा तब्बल ८० ते ९० लाख रुपयांचा आहे. वारजे पाेलिसांनी तपास करून त्यामध्ये स्पष्टपणे घाेटाळा झाल्याचे नमूद केले आहे. ताे अहवाल महापालिकेकडे पाठवून दाेन महिने झाले तरी काहीच कारवाई झालेली नाही. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
- डाॅ. सतीश काेळसुरे, वैद्यकीय अधिकारी, बारटक्के दवाखाना तथा तक्रारदार
या प्रकरणाची मायक्राेबायाेलाॅजिस्टद्वारे चाैकशी सूरू आहे. त्यामुळे या प्रकरणावर काेणतेही भाष्य करता येणार नाही. चाैकशीतून जी माहीती समाेर येईल त्याचा अहवाल पाेलिसांना पाठवण्यात येईल. या प्रकरणात माझा काही संबंध नाही.
- डाॅ. आशिष भारती, आराेग्यप्रमुख पुणे मनपा