पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:17+5:302021-07-02T04:09:17+5:30
आळंदीतून ज्येष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (दि.२) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल. शासनाच्या निर्देशानुसार आळंदीत माऊलींच्या पालखी ...
आळंदीतून ज्येष्ठ वद्य अष्टमीला शुक्रवारी (दि.२) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान होईल. शासनाच्या निर्देशानुसार आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शंभर वारकऱ्यांव्यतिरिक्त साडे तीनशे वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रस्थान सोहळ्यामध्ये शंभर वारकऱ्यांव्यतिरिक्त अडीचशे वारकऱ्यांना दर्शनासाठी शासनाने परवानगी दिली आहे.
आषाढ शुद्ध दशमी अर्थातच १९ जुलैला सर्व पालख्या एसटीने पंढरीला मार्गस्थ होऊन वाखरी येथे पोहोचतील. वाखरीत गेल्यानंतर मात्र मानाच्या पालख्यांना परंपरेनुसार चालण्याच्या परवानगीसाठी सर्व देवस्थान आग्रही होते. त्यानुसार शासनाने वाखरी ते ईसबावी येथील विसावा मंदिरापर्यंतचे तीन किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांच्या चाळीस वारकऱ्यांना पायी वारीसाठी परवानगी दिली आहे. तर ईसबावी येथील विसावा मंदिरापासून पुढे पंढरपुरापर्यंत साडेतीन किमीचे अंतर सर्व पालखी सोहळ्याचे एकत्रित मिळून केवळ २० वारकरी पायी जातील. आषाढी वारीसाठी वाखरी येथे आलेल्या सर्व मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील उर्वरित सहभागी ३८० वारकरी इसबावीपासून थेट वाहनाने पंढरपुरात विसाव्यासाठी पोहोचतील. पंढरपुरात जाताना मात्र सर्वांनी मानाच्या क्रमाने आणि सामाजिक अंतर ठेवूनच मार्गक्रमण करावयाचे असल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.