पुणेकरांसाठी दिलासादायक! कोरोना चाचण्या वाढल्या, तर रुग्ण घटले; बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:33+5:302021-07-20T11:00:07+5:30
प्रज्ञा केळकर - सिंग पुणे : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत सरत्या आठवड्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले, तर रुग्णसंख्या घटल्याचे ...
प्रज्ञा केळकर - सिंग
पुणे: गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत सरत्या आठवड्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले, तर रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले. ११ ते १८ जुलै या कालावधीत शहरात ४४,६९५ चाचण्या झाल्या. त्यापैकी १८६१ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाले. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.१६ टक्के इतका नोंदवला गेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ५ टक्क्यांपुढे जााऊ नये, यासाठी प्रशासन आणि नागरिक अशा एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित होत आहे. तिसऱ्या लाटेच्या प्राथमिक अवस्थेला सुरुवात झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याने सतर्कता बाळगणे आवश्यक बनले आहे.
७ जूनपासून आजवर प्रत्येक आठवड्याचा आढावा घेतल्यास, सरत्या आठवड्यात दीड महिन्यातील सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. आठवड्याची रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी दररोजची रुग्णसंख्या अजूनही २५०-३५० पेक्षा खाली आलेली नाही. सरत्या आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या रविवारी, १८ जुलै रोजी ३६४ इतकी नोंदवली गेली. तर, १२ जुलै रोजी सर्वात कमी १८९ इतकी नोंदवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार, पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास आणि हा आलेख उतरता राहिल्यास लाट ओसरते आहे, असे मानले जाते.
दररोजच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही यंदाच्या आठवड्यात जास्त आहे. आठवड्यात १८६१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले, तर २१४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ५ ते ७ इतकी नोंदवली जात आहे. मृतांची संख्याही आटोक्यात येणे गरजेचे असल्याचे मत वैद्यक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीतही हा आठवडा दिलासा देणारा
पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीतही हा आठवडा दिलासा देणारा ठरला आहे. ७-१४ जून या कालावधीत ४.६७ टक्के, १४-२० जून या कालावधीत ४.८२ टक्के, २१-२७ जून या कालावधीत ४.७० टक्के, २८ जून- ४ जुलै या कालावधीत ५.३८ टक्के, ५ ते ११ जुलै या कालावधीत ५.३७ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. १२ ते १८ जुलै या कालावधीत गेल्या दीड महिन्यातला सर्वात कमी ४.१६ टक्के हा पॉझिटिव्हिटी रेट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महिन्याभरातील स्थिती :-
आठवडा चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी
७ - १३ जून ३९,८८५ १८५८ ४.६७
१४-२० जून ३६,१३९ १७४२ ४.८२
२१-२७ जून ३६,८०८ १७३० ४.७०
२८ जून-४ जुलै ३९,८८८ २१४८ ५.३८
५ - ११ जुलै ३८,५४३ २०७२ ५.३७
१२- १८ जुलै ४४,६९५ १८६१ ४.१६
आठवड्याची स्थिती :-
दिवस चाचण्या पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले रुग्ण
१२ जुलै ४८०२ १८९ २७९
१३ जुलै ५८४० २२८ ३४४
१४ जुलै ८०९९ ३३१ २७७
१५ जुलै ७६९६ ३३४ २१२
१६ जुलै ७९५० २८३ २६८
१७ जुलै ८०५२ ३२१ ४३२
१८ जुलै ७०५८ ३६४ ३३१