Coronavirus| लसीकरणामुळे पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 02:46 PM2022-01-12T14:46:58+5:302022-01-12T14:49:08+5:30
मार्च २०२० मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आणि साथीला सुरुवात झाली
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत अनेकांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. दुसऱ्या लाटेत बहुसंख्य रुग्णांना श्वसनाचा त्रास झाला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. पण, तिसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसत नाहीत. विषाणूमधील बदल आणि लसीकरण यामुळे तिसरी लाट सध्यातरी सौम्य असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
मार्च २०२० मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील पहिल्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आणि साथीला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाल्याने तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात भरती होण्याचे, तीव्र लक्षणांचे प्रमाण कमी आहे. मात्र, तिन्ही लाटांमध्ये बेशिस्त वर्तन कायम असल्याची बाब तज्ज्ञांनी अधोरेखित केली.
पहिली लाट : मार्च ते सप्टेंबर २०२०
सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट : २४.८६ टक्के
दुसरी लाट : फेब्रुवारी ते मे २०२१
सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट : २६ टक्के
तिसरी लाट : डिसेंबर शेवटच्या आठवड्यास सुरुवात
संभाव्य पॉझिटिव्हिटी रेट : २८ ते ३० टक्के
२०२१ मधील स्थिती :
सर्वात कमी रुग्णसंख्या - ९८ (२५ जानेवारी)
सर्वाधिक रुग्णसंख्या - ७०१० (८ एप्रिल)
सर्वात कमी सक्रिय रुग्ण - १३८३ (७ फेब्रुवारी)
सर्वाधिक सक्रिय रुग्ण - ५६६३६ (१८ एप्रिल)
पहिल्या लाटेमध्ये कोरोना विषाणू आपल्यासाठी पूर्णतः नवीन होता. त्यामुळे उपाययोजना करताना आरोग्य यंत्रणाही गोंधळलेली होती. मृत्युदरही काहीसा जास्त होता. दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला. बहुतांश रुग्णांना तीव्र संसर्गाचा सामना करावा लागला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, स्टेरॉइड्स यांचा तुटवडा जाणवला, आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण निर्माण झाला. तिसरी लाट ही दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण झाली आहे. ८० टक्के ओमायक्रॉन आणि २० टक्के डेल्टा असे प्रमाण अपेक्षित आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक अनुभवायला मिळेल आणि नंतर तिसरी लाट ओसरू लागेल. यादरम्यान रुग्णसंख्येचे प्रमाण वाढले आणि त्यातील १ टक्का रुग्णांना हॉस्पिटलची गरज भासली तरी आरोग्य यंत्रणेला पुन्हा सज्ज राहावे लागणार आहे. लसीकरण बऱ्यापैकी झाले असल्याने यंदा रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा
पहिल्या लाटेमध्ये कोरोनाबाबत कोणतेही संशोधन नव्हते. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटली. मात्र मृत्युदर आणि रुग्णसंख्या रोखण्यास तो यशस्वी ठरला. पहिल्या लाटेतून शासन आणि नागरिकांनीही धडा न घेतल्याने मोठा फटका बसला. आरोग्य यंत्रणेची तयारीही कमी पडल्याने प्रचंड ताण निर्माण झाला. तिसऱ्या लाटेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने पुरेशी पूर्वतयारी केली आहे. त्यामुळे मृत्युदर कमी राहील, लसीकरणामुळेही मोठा हातभार लागला आहे. मात्र, तिन्ही लाटांमध्ये नागरिकांचे बेशिस्त वर्तन कायम राहिले आहे. नियम न पाळल्याने आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य