पुणे शहरातील नऊ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:48 PM2020-02-13T20:48:23+5:302020-02-13T20:50:26+5:30
‘कोरोना’च्या संशयित रुग्णांचे उपचार आता शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये होऊ शकणार
पुणे : जगभरातील नागरिकांनी धसका घेतलेल्या ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांचे उपचार आता शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये होऊ शकणार आहेत. महापालिकेमध्ये शहरातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या रुग्णालयांना राज्य शासनाचे निकष, मार्गदर्शक सूचना आणि आवश्यक माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यावेळी नऊ रुग्णालयांनी कोरोनाच्या संशयित रुग्णांवर उपचाराची तयारी दर्शविल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. पालिकेने ही सुविधा देण्यासंदर्भात शहरातील प्रमुख २५ रुग्णालयांना विचारणा करीत बैठकीला येण्यासंदर्भात कळविले होते. पालिकेच्या आवाहनाला 15 रुग्णालयांनी प्रतिसाद दिला. या रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीला आरोग्य प्रमुख डॉ. हंकारे यांच्यासह सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वावरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये नऊ रुग्णालयांनी उपचारांची तयारी दर्शविली. उपचारांची तयारी दर्शविलेल्या रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणाºया विलगीकरण कक्षांची तपासणी पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. तपासणीनंतर कक्षांची संपुर्ण माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला कळविण्यात येणार आहे. रुग्णालयांच्या प्रतिनिधींना राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली. तसेच विलगीकरण कक्ष तसेच आजार गंभीर झाल्यास त्यावर कराव्या लागणाºया उपचारांसाठीच्या यंत्रणेची माहिती घेण्यात आली. या रुग्णालयांचे लेखी प्रस्ताव घेण्यात येणार आहेत. आरोग्य पथकाकडून उपचार होणाºया कक्षाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयांना उपचारासाठीची परवानगी देण्यासंदर्भात शासनाच्या आरोग्य विभागाला तातडीने कळविण्यात येणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाकडून मान्यता मिळताच परदेशातून आलेल्या आणि कोरोना संशयितांना या रुग्णालयांची माहिती देण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रवासी आपापल्या आवश्यकतेनुसार या रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकणार आहेत.