कोरोनाने ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित केले : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:50+5:302021-08-21T04:14:50+5:30
पुणे : कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मानवनिर्मित यांत्रिक आॅक्सिजन प्लान्टपेक्षा निसर्गनिर्मित ऑक्सिजन ...
पुणे : कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच पटले आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मानवनिर्मित यांत्रिक आॅक्सिजन प्लान्टपेक्षा निसर्गनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज आहे. यासाठी नागरी सहभागातून वनीकरणाची नितांत गरज आहे. प्रशासनाने वनीकरणासाठी व वृक्ष संगोपनासाठी नागरिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली़
महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या पुढाकाराने वारजे डुक्कर खिंडलगतच्या वनविभागाच्या ३५ एकर जागेत संजीवन वन उद्यान उभारण्यात येत आहे. या उपक्रमाचे भूमिपूजन अजित पवार आणि राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, बाबूराव चांदेरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पशु, पक्ष्यांच्या अधिवासाला अनुरूप देशी झाडे लावावीत़ कोणाला झाडे लावायची असतील व ती वाढवायची असतील पण जागा नाही, असे निदर्शनास आल्यास वनविभाग व महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून द्यावी़ विदेशी झाडे काढताना टप्प्याटप्प्याने ती काढावीत व त्याठिकाणी वड, पिंपळ, आंबा यासारखी देशी झाडे लावावीत व ती वाढवावीत अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
वनविभाग आणि उद्यानांच्या जागेवर कचरा होणार नाही यासाठी नागरिक आणि प्रशासनाने ही एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापालिका व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या संजीवन वन उद्यानामागील भूमिका यावेळी सांगितली़
-----------------------
फोटो मेल केला आहे़