Corona Vaccination: उद्या लसीकरणाचे किती डोस द्यायचे हे आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कळत नाही: मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:16 PM2021-05-05T20:16:44+5:302021-05-05T20:17:04+5:30
१८ वयापुढील नागरिकांची संख्या २० लाखांवर अन् लस मात्र सध्या १० हजार : मुरलीधर मोहोळ
पुणे : पुणे शहराला सध्या ज्या लसी उपलब्ध होत आहेत. त्या ४५ वयोगटापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. तसेच १८ वयाच्या पुढील नागरिकांनाही लसींचा पहिला डोस दिला जातोय.मात्र, या वयोगटातील नागरिकांची संख्या २० लाखांवर आहे आणि लस फक्त सध्या १० हजार मिळाल्या आहेत अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देतानाच उद्या किती डोस द्यायचे हे आज रात्री उशिरापर्यंत कळत नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने आपापसांत समन्वय साधून पुणे शहराला कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ बुधवारी ( दि.५ ) करण्यात आले. यावेळी उपस्थित विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर महापौर बोलत होते. मोहोळ म्हणाले, एका मिनिटाला ८०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या २ युनिट्स सुरू झालेत. यामुळे १७० रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकणार आहे. लवकरच पालिकेच्या उर्वरित ६ दवाखान्यातही असे ऑक्सिजन प्लांट सुरू केले जाणार आहे. यामुळे ऑक्सिजन करता कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही हे सांगून राज्यातील कोणत्याही महापालिकेच्या रुग्णालयात अशा प्रकारचा प्लांट नाही. केवळ पुणे पालिकेने प्रथम सुरू केला असल्याचा दावाही महापौरांनी केला आहे. पालिका रुग्णालयात सध्या २ हजार रुग्ण आहेत त्यापैकी ३० टक्के म्हणजे ६०० रुग्णांना रेमडेसिविरची गरज आहे. ती पण जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावीत असेही मोहोळ यावेळी म्हणाले.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पुणे जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र एकूण ७५ लाख नागरिकांपैकी २५ लाख लोकांना लस दिल्या आहेत. जिल्ह्याने लशीकरणात आघाडी घेतली आहे अशी माहिती दिली आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अर्थात संसर्गाचे प्रमाण कमी होतेय. मात्र सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यात संसर्ग वाढतोय याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
पुणे शहर आणि जिल्ह्यात कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने संसर्गाचे प्रमाण कमी झाले असे निरीक्षणही राव यांनी यावेळी बोलताना नोंदविले.